डोंबिवली परिसरात रस्त्यावर नागरिकांना चालण्यासाठी जागा नसते इतक्या मोठ्या प्रमाणात रिक्षा उभ्या असतात. अशात डोंबिवलीत रिक्षा अपघाताची एक घटना समोर आलीये. शाळकरी विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा अपघात झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास डोंबिवली चार रस्ता येथे घडली. रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा जागेवरच फिरली अन चालकाने बाहेर उडी घेतली. यावेळी रिक्षा थेट फुटपाथवर चढली. या ठिकाणी दुचाकी उभ्या असल्याने रिक्षा अडवली गेली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. (हेही वाचा - Ulhasnagar Accident: उल्हासनगरमध्ये भरधाव गाडीची 5 ते 6 वाहनांना धडक, भीषण अपघाताचा VIDEO समोर)
रिक्षामध्ये तीन विद्यार्थी होते. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. कल्याण डोंबिवली शहरात एकीकडे अवजड वाहनांची समस्या भेडसावत असताना आता पुन्हा एकदा शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या रिक्षांचा मुद्दा समोर आला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत, घरी सोडवणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येतेय.
संबंधित रिक्षाचालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात घडलाय. सुदैवाने कोणीही जखमी नाही. मात्र या रिक्षाचालकावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांविरोधात कारवाईसाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची संयुक्त मोहीम हाती घेण्यात येणार आहेत.