Dockyard Road Railway Station Lady Attack:  महिलेचा गळा चिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस अटक; डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशन सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
Dockyard Road Railway Station | (File Photo)

महिलेचा गळा चिरुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. मोहित आगळे (वय 23 वर्षे) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला नवी मुंबई (Mumbai) येथून अटक करण्यात आली. ही घटना मुंबईतील डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशन (Dockyard Road Railway Station) फलाटावर घडली होती. मोहित आगळे हा रेल्वे फलाटावर महिलेचा गळा चिरत होता. दरम्यान, काहीतरी गडबड असल्याचा संशय मध्य रेल्वेच्या सिनिअर तिकीट बुकिंग ऑफिसरला आला. त्यामुळे वेळीच हालचाल झाल्याने महिलेचे प्राण वाचले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली.

घटनेबाबत माहिती अशी की, हल्ला झालेली महिला 23 वर्षे वयाची आहे. आरोपी आणि सदर महिला ही पुणए येथील तळेगाव भागात शेजारी-शेजारी राहात होते. दोघे एकमेकांना जवळपास अडीच वर्षांपासून ओळखत होते. या ओळखीतून दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. दरम्यान, दोघांमध्ये सातत्याने वाद होऊ लागले. या वादाला कंटाळून या महिलेने आरोपी मोहित याच्यासोबतचे सर्व संबंध तोडून आपल्या लेखीसोबत मुंबई गाठली. मुंबईत ही महिला आपल्या नातेवाईकांच्या घरी चार महिन्यांपासून राहात होती. (हेही वाचा, डॉकयार्ड रेल्वे स्थानकात तिकीट खिडकी तोडून चोरांनी मारला डल्ला, वडाळा रेल्वे पोलिसांचा तपास सुरु)

महिला मुंबईला आल्यानंतर मोहित तिला पाठीमागून वारंवार फोन करत असे. मात्र, ती त्याच्या फोनला दाद देत नसे. एकदा तिने फोन उचला तेव्हा मोहितने तिला एकदाच भेट असे सांगितले. तसेच, फक्त एकदाच वडाळा स्टेशनवर भेटायला ये असे सांगितले. एक जानवारी या दिवशी ती बुरखा घालून आपल्या मुलीसह भेटायला आली. या वेळी मोहित याने आपल्यासोबत येण्यासाठी दबाव टाकला आणि त्यांच्यात वाद झाला. वडाळा स्टेशनला ट्रेन येताच ती थेट ट्रेनमध्ये चढली आणि निघाली. मात्र, मोहितने तिचा पाटलाग केला.

मोहीत याने संबंधित महिलेला डॉकयार्ड स्टेशनवर उतरण्यास भाग पाडले. दरम्यान, सायंकाळाळी साडेसात वाजणेच्या सुमारास ही महिला तिकीट बुकींग ऑफिसर जवळ असलेल्या एका बाकावर बसली होती. तिच्या मांडीवर तिची मुलगी होती. त्यांच्यातील वाद सुरुच होता. दरम्यान, आरोपी मोहितने महिलेचे लक्ष नसल्याचे पाहून जवळच्या रेझरने तिचा गळा चीरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिने आरडाओरडा केल्याने मध्य रेल्वेचे बुकिंग क्लार्क आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तिच्या मदतीला धावून आले. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. महिलेकडे चौकशी करुन पोलिसांनी मुलीला तिच्या नातेवाईकांकडे सोडले आहे. तर आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.