डॉकयार्ड रेल्वे स्थानकातील (Dockyard Railway Station) तिकिट खिडकी उखडून काही चोरांनी तिकिट विक्री करून जमा झालेल्या रक्कमेवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. याचबरोबर पैसे मिळण्याच्या आशेने स्थानकातील वॉटर वेंडिंग मशिनचीही तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपींची ओळख पटवण्यात आली असून लवकरच त्यांना पकडण्यात येणार असल्याची माहिती वडाळा रेल्वे पोलिसांनी (Wadala Railway Police)दिली.
शनिवारी मध्यरात्री 2.45 च्या सुमारास या चोरांनी डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकातील तिकिट खिडकीची काच तोडून आत प्रवेश केला. यावेळी गल्ल्यातील तिकिट विक्रीतून जमा झालेली 3 हजार 886 रुपयांची रक्कम घेत चोरट्यांनी पळ काढला. दरम्यान स्थानकावरील वॉटर वेंडिंग मशिनचा दरवाजाची देखील तोडफोड करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. डॉकयार्ड परिसरात गर्दुल्ल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यापैकीच कोणीतरी ही चोरी केल्याचे शक्यता वर्तवली जात आहे.(Mira Road: जेवणाचे बिल भरण्याचे कारण सांगून हॉटस्पॉटसाठी चक्क ग्राहकाने लंपास केला हॉटेलमालकाचाच मोबाईल)
या स्थानकात प्रवाशांची वर्दळ अन्य स्थानकांच्या तुलनेत कमी असते. त्यात शनिवारी सुट्टी असल्याने स्थानकात तिकिटविक्री देखील कमी प्रमाणात होती. या प्रकरणी चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संशयित आरोपींची ओळख पटली असून येत्या दोन-तीन दिवसांत आरोपींना बेड्या ठोकण्यात येणार असल्याची माहिती वडाळा रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी दिली आहे.