Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal | Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात आतापर्यंत पाच वेळा लॉकडाऊन (Lockdown) घोषीत करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून गरिबांना अन्नधान्याचे विक्रमी वाटप करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात 68 लाख 13 हजार क्विंटल, मे महिन्यात 76 लाख 83 हजार क्विंटल धान्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 1 एप्रिल ते 5 जूनपर्यंत 62 लाख 84 हजार 413 शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. यासंदर्भात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माहिती दिली आहे. कोरोना काळात राज्यातील एकही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी शासनाने राज्यातील 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून योग्य नियोजनाद्वारे राज्यातील गोरगरीब व गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत 6.69 कोटी नागरिकांना 36 लाख 61 हजार क्विंटल (95%) धान्य वितरित करण्यात आले आहे. (वाचा - Coronavirus Updates: मुंबईतील धारावीत आज COVID19 चे आणखी 10 रुग्णांची भर पडल्याने आकडा 1899 वर पोहचला, मुंबई महापालिकेची माहिती)

याशिवाय प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा लाभार्थ्यांना नियमित धान्य घेतल्यानंतर एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिना 5 किलो मोफत तांदूळ देण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत एप्रिल महिन्यात 5 कोटी 93 लाख (90 टक्के) लाभार्थ्यांना 31 लाख 51 हजार 380 क्विंटल मोफत तांदळाचे वितरण करण्यात आले. तसेच लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या 36 लाख 58 हजार 699 लाभार्थ्यांनी एप्रिलमध्ये राज्यात ते जिथे आहेत तिथे धान्य घेतले आहे. (वाचा - कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश)

दरम्यान, मे महिन्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत 6.58 कोटी नागरिकांना 36 लाख 92 हजार 90 क्विंटल (90 टक्के) धान्य वितरित करण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत 6 कोटी 2 लाख लाभार्थ्यांना 31 लाख 73 हजार 220 क्विंटल (91 टक्के) मोफत तांदळाचे वितरण करण्यात आले. याशिवाय Portability मुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या 19 लाख 46 हजार 534 स्थलांतरित लाभार्थ्यांनी राज्यात ते जिथे आहेत तिथे धान्य घेतले आहे.

लॉकडाऊन काळात राज्यात दररोज 838 शिवभोजन केंद्रांमधून दीड लाख शिवभोजन थाळींचे वितरण होत आहे. राज्यात एप्रिल महिन्यात 772 केंद्रांमधून 23 लाख 99 हजार 737 शिवभोजन थाळ्या, मे महिन्यात 838 केंद्रांमधून 33 लाख 84 हजार 40 शिवभोजन थाळ्या तर जून महिन्यात 1 ते 5 जून पर्यंत 838 केंद्रांमधून 5 लाख 636 शिवभोजन थाळींचे वितरण करण्यात आले आहे. यासंदर्भात छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे.