Devendra Fadnavis | (Photo Credit: Twitter)

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session) सुरु आहे. हे अधिवेशन विविध मुद्द्यांवरुन वादळी ठरत आहे. सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील अनेक विषय चर्चेला येत असून, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. विरोधकांकडून अनेक मागण्या केल्या जात आहेत. तर सरकारकडून घोषणा केल्या जात आहेत. दिशा सालियन (Disha Salian Case) मृत्यू प्रकरणावरुनही आज सभागृहात जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. दिशा सालीयन यांचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या घरी कोणता नेता गेला होता याची चौकशी केली जावी अशी जोरदार मागणी आमदार नितेश राणे आणि भरत गोगावले यांनी सभागृहात केली. त्यानंतर या प्रकरणाची एसआयटीमार्फत (Special Task Force) चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

दिशा सालीयन प्रकरणामुळे सभागृहात आज जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. त्यामळे विधानसभा अध्यक्षांना सभागृाचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले. दिशा सालीयन प्रकरणाच्या चौकशीची घोषणा करताना ही केस पोलिसांकडे असून कुणाकडे काही पुरावे असतील तर ते द्यावेत, असेही देवेंद्र फडणवीस सभागृहा म्हणाले. फडणीस यांनी सांगितले की, दिशा सालियन प्रकरण हे पोलिसांकडेच आहे. हे प्रकरण सीबीआयकडे गेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी द्वारे चौकशी केली जाईल. सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे गेले आहे. दरम्यान काही नवे पुरावे आले तर त्याची चौकशी केली जाईल. (हेही वाचा, Sushant Singh Rajput Suicide Case: सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा; आमदार नितेश राणे यांची मागणी)

विरोधी पक्ष नेते अजित पवार या प्रकरणात बोलताना म्हणाले की, दिशा सालियन आता आपल्यात हायात नाही. त्यांच्याबद्दल बोलून आम्हाला त्याना पुन्हा बदनाम करायचे नाही. त्यांच्या आईवडीलांनीही हात जोडून विनंती केली आहे. आमची मुलगी तर गेली. आता आम्हाला अधिक त्रास देऊ नका. आम्हाला जगू द्या. बदनामी थांबवा, असे सांगितले आहे. त्यामुळे हे प्रकरण आता पुन्हा उकरुन काढू नये.तसेच, जर दिशा सालीयनची चौकशी करत असाल तर पूजा चव्हाण प्रकरणाची देखील चौकशी करा. चौकशी होणारच असेल तर सर्वांचीच करता येईल. केवळ राजकारण करु नका, असेही अजित पवार म्हणाले.