
दिशा सालियान मृत्यू प्रकरण (Disha Salian Case) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे नाव घेऊ नका, यासाठी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वत: दोन फोन केल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला होता. यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रतिकार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात कोणासही फोन केला नाही. पण, नारायण राणे यांना अटक झाली तेव्हा मात्र त्यांच्या कुटुंबाकडून उद्धव ठाकरे यांना अनेक फोन आल्याची माहिती संजय राऊत यानी दिली आहे. त्यामुळे फोन प्रकरणात आता चांगलेच ट्विस्ट निर्माण झाले आहे.
कोणालाही फोन केला नाही
दिशा सालियान प्रकरण महाराष्ट्रात चांगलेच तापले आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, या विषयी माझी स्वत: उद्धव ठाकरे आणि मिलींद नार्वेकर यांच्याशी बोलणे झाले, चर्चा झाली. त्यांनी अशा प्रकारचा कोणताही फोन कोणाला केला नसल्याचे सांगितले. खरे तर नारायण राणे हे नेमके कोणत्या आधारावर हे आरोप आणि दावे करत आहेत याबाबत खरोखरच समजून घ्यायला हवे. त्यांच्या वयाची सत्तरी झाली आहे. आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते, असेही राऊत म्हणाले. (हेही वाचा, Disha Salian Death Case: 'उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन करून आदित्यला वाचवण्यास सांगितले'; मंत्री Nitesh Rane यांचा मोठा दावा (Video))
सांभाळून घ्या, कुटुंबीयांचे फोन
दिशा सालीयन प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी कोणासही फोन केला नव्हता. मात्र, नारायण राणे यांना अटक झाली तेव्हा त्यांच्या कुटुंबातून अनेकांचे फोन आले होते. त्यांची प्रकृती बरी नाही. त्यांना काही विकार आहेत. त्यामुळे जरा सांभाळून घ्या, असे अनेक फोन त्यांच्या कुटुंबीयांनी उद्धव ठाकरे याना केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना सूचना देऊन त्यांची सूटका करायला लावल्याची माहिती संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. (हेही वाचा, Disha Salian Death Case: आदित्य ठाकरेंवर होणाऱ्या आरोपांवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, '... तर भाविष्यात तुम्हालाच अडचणी निर्माण होतील')
संजय राऊत पुढे म्हणाले, नारायण राणे यांना अटक झाली तेव्हा केंद्रातूनही उद्धव ठाकरे यांना फोन आले होते. ते आमचे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचे फोन आले होते. खरे म्हणजे अशा गोष्टी काढायच्या असतात का? पण त्या गोष्टी होऊन आता पाच वर्षे झाली. आता त्या गोष्टी तुम्ही काढत असतात त्यामुळे आम्हालाच सगळं सांगावं लागतं आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. वैयक्तीक गोष्टींना मुलामा देऊन त्या अशा पद्धतीने रंगवून सांगितल्या जात आहेत. महाराष्ट्रात या आधी हे वातावरण कधीच नव्हते, भाजप सत्तेत आल्यापासून हे दळभद्री राजकारण सुरु झाल्याचा घणाघातही संजय राऊत यांनी केला.