Rohit Pawar | (Photo Credits: Facebook)

किसान सन्मान निधीवरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून ‘किसान सन्मान निधी’चे पैसे तुघलकी पद्धतीने व्याजासह वसूल करायचं सरकारने ठरवलं की काय, अशी शंका येते" अशी टिका त्यांनी ट्विटद्वारे केली आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत केंद्र सरकारने 700 ते 800 रुपयांची वाढ केली आहे. पेट्रोलच्या किमती शंभर पार असतानाचं केंद्राने खतांच्या किमती भरमसाठ वाढवून सामान्यांना वेठीस धरल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

"कोरोनाच्या काळात उद्योगांचे कंबरडे मोडून बेकारी वाढत असताना शेती हेच एकमेव क्षेत्र आहे. जे लोकांच्या जगण्याचा आधार बनलंय. अशा परिस्थितीत खतांच्या किंमती वाढवून हा आधारही सरकारने काढून घेऊ नये आणि या वाढीव किंमती तातडीने कमी कराव्यात, ही विनंती!", असे रोहित पवार म्हणाले.हेदेखील वाचा- अजित पवारांनी भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवला, भाजप आमदाराचा आरोप

दरम्यान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील याच मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टिका केली आहे. पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढल्याचा धक्का सर्व भारतीयांना लागलाच आहे. मात्र आता खतांच्या किमती प्रचंड वाढविण्याचे पाप केंद्र सरकारने केले आहे. करोनाने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या माथी हा दरवाढीचा बोजा टाकत केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या खतांच्या दरवाढीचा निषेध करते. आमचा शेतकरी बांधव याविरोधात आंदोलन करणार आहे. त्या आंदोलनास देशभरातून प्रतिसाद मिळेल, हा मला विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहील", असे जयंत पाटील म्हणाले होते.