कोरोना लस (COVID Vaccine) आणि लसीकरणाबाबत राज्य सरकारावर बोट दाखवत विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. दरम्यान भारत बायोटेकच्या पुण्यातील प्रकल्पावरून भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे (Krushana Khopde) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. प्रकल्प विदर्भात होणार होता, मात्र पवारांनी तो पुण्याला पळवला, असं खोपडे यांनी म्हटलं आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीला पुण्यात लस निर्मिती प्रकल्पासाठी जागा देण्यात आली असून, सरकारने 28 एकर जागा कंपनीला हस्तांतरित केली आहे.
भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. "नवे प्रकल्प आणण्याची हिंमत नसलेल्या विदर्भातील नेत्यांनी किमान आलेले प्रकल्प थांबवण्याची सुद्धा हिंमत दाखवली नाही. विदर्भाच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प आणण्यासाठी अधिकारी धडपड करतात. मात्र त्यांना राजकीय स्थान मिळत नाही. त्यामुळे ते पळविले जातात. ही विदर्भासाठी दुर्दैवी बाब असून, पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह काँग्रेसचे नेते गप्प का बसले?" असा सवाल खोपडे यांनी केला आहे.हेदेखील वाचा- Mumbai Water Logging Update: मुंबईतील गामडिया जंक्शन, नेताजी चौक, महालक्ष्मी जंक्शन आणि मिलन सबवे येथे वॉटर लॉगिंग
"नागपूरमधील मिहान परिसरात सिरम आणि भारत बायोटेकला निमंत्रित करण्यात आले होतं. भारत बायोटेकची इन्स्टिट्यूट स्थापन करण्यासाठी एक समिती स्थापन करम्यात आली होती. तसेच सादरीकरण (प्रेझेंटेशन) करण्याचे निर्देशही दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मिहान प्रोजेक्टबद्दल माहिती होती. असं असतानाही विदर्भावर अन्याय करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबाबत त्यांनी शब्दही काढला नाही," असही खोपडे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 34,389 रुग्ण आढळे असून 974 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 53,78,452 इतकी झाली आहे.