परळी: वादग्रस्त क्लिप प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
Dhananjay Munde | (Photo Credit-Facebook)

Maharashtra Assembly Elections 2019: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) परळी (Parli ) विधानसभा मतदारसंघातील उमेदवार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता (Indian Penal Code) कलम 500,509,294 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप (BJP) शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याची एक क्लिप परळी विधानसभा मतदारसंघात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये अत्यंत गलिच्छ व बिभत्स शब्द वापरले गेले आहेत. या क्लिपमध्ये टीका करणारा व्यक्ती हे धनंजय मुंडे असल्याचा आरोप आहे.

व्हायरल झालेल्या 'त्या' क्लिपवरुन भाजपने महिला आयोग आणि निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. या तक्रारीत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंकजा मुंडे यांनी प्रचार शृंखलेतील परळी विधानसभा मतदारसंघात शेवटची सभा घेतली. या सभेतील भाषण आटोपून परतताना पंकजा मुंडे यांना सभास्थळी अचानक भोवळ आली. त्या खाली कोसळल्या. (हेही वाचा, परळी: विधानसभेच्या प्रचारसभेत पंकजा मुंडे चक्कर येऊन कोसळल्या (Watch Video))

दरम्यान, भाजप नेते सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांना भोवळ येण्यास धनंजय मुंडे हेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 'त्या' व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये धनंजय मुंडे यांनी अत्यंत खालच्या पातळीला जात बिभत्स शब्द वापरण्यात आले होते. पंकजा मुंडे यांच्या भावनीक मनाला हे शब्द लागले. त्यामुळे तणावातून त्यांना भोवळ आली, असा आरोप प्रसारमाध्यमांशी बोलत असताना सुरेश धस यांनी केला.

भाजप उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यातील सामना हा मराठवाड्याच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण लढत आहे. दोघेही बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. दोघेही भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मंडे यांच्या राजकीय मार्गदर्शनाखाली वाढले आहेत. 2014 च्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पंकजा मुंडे या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. परळीतील जनता कोणाला साथ देते पाहणे उत्सुकतेचे आहे.