काल दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल केलेल्या विधानानंतर विरोधक आणि सत्ताधारांमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. त्यातच आजच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल केलेल्या वक्तव्याची भर पडली आणि याला विरोधकांकडून उत्तर देण्यात आले. शरद पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या विधानावला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा?" पुढे ते म्हणतात, "साहेब! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती!" (Sharad Pawar on Modi Government: इंधन दरवाढ, यंत्रणांचा गैरवापर यांसह विविध मुद्द्यांवरुन शरद पवार यांची मोदी सरकारवर टीका)
देवेंद्र फडणवीस ट्विट:
द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा?
साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 16, 2021
काय म्हणाले होते शरद पवार?
महाविकास आघाडीचे सरकार झाले तेव्हा नेतृत्व करण्यासाठी तीन चार नाव समोर आली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा माझा आग्रह होता. त्यांची मुख्यमंत्री होण्याची तयारी नव्हती. परंतु, मी त्यांचा हात धरुन उंचावला, असं शरद पवार म्हणाले. बाळासाहेबांनी आणि त्यांच्या पक्षाने महाराष्ट्रासाठी केलेले योगदान विसरता कामा नये. त्यामुळेच त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा माझा आग्रह होता, हे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर फडणवीस साहेब मी तुम्हाला विनंती करतो असे कोणतेही आरोप करु नका, असंही ते पुढे म्हणाले.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
भाजपनं शिवसेनाला दिलेलं वचन मोडलं नसतं तर ते आताही सत्तेत असते. त्यांनी वचन पाळलं असतं तर कदाचित मी राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो. पण त्यांनी वचन मोडलं आणि त्यामुळेच पुत्रकर्तव्य म्हणून मी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारावी. कारण तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदी बसवून दाखवीन, असं मी माझ्या पित्याला वचन दिलं होतं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कालच्या दसरा मेळाव्यात बोलले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मधील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. "दोन वर्ष झाली किती वेळा म्हणणार मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. आता मुखवटा काढा आणि मुख्यमंत्री होण्याची तुमची महत्त्वाकांक्षा होती हे मान्य करा," असं ते म्हणाले होते.