Sharad Pawar on Modi Government: इंधन दरवाढ, यंत्रणांचा गैरवापर यांसह विविध मुद्द्यांवरुन शरद पवार यांची मोदी सरकारवर टीका
NCP Chief Sharad Pawar (Photo Credits: ANI)

पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP leader Sharad Pawar) यांनी विविध मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर (Modi Government) टीका केली आहे. सीबीआय (CBI), ईडी (ED), आयटी (IT), एनसीबी (NCB) यांसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्राकडून होत असल्याची टीका पवार यांनी यावेळी केली. पण तुम्ही कितीही छापे टाका, कारवाई करा पण महाराष्ट्र सरकार त्यांची 5 वर्ष पूर्ण करणार आणि पुन्हा सत्तेत येणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले की, "केंद्र सरकारला सामान्यांविषयी कोणतीही आस्था नाही. दिवसेंदिवस पेट्रोलची किंमत वाढत आहे. पेट्रोल हे सरकारचं उत्त्पन्न वाढवण्याचे साधन असल्याचा भाजपचा दृष्टीकोन आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किंमती काही कमी होणार नाहीत." साधारण सहा महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमती एकदम खाली आल्या, पण केंद्र सरकारने या देशातील पेट्रोलच्या किंमती कमी केल्या नाहीत. केंद्र सरकार सामान्य जनतेला महागाईच्या दरीत ढकलत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (भाजप ED, CBI आणि NCB चा गैरवापर करत आहे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप)

ANI Tweet:

त्याचबरोबर केंद्र सरकारकडून 35,000 कोटींची जीएसटीची रक्कम येणं  बाकी असल्याचंही ते हे देखील त्यांनी सांगितलं. जेव्हा महाराष्ट्र सरकारने 3,000 कोटी रुपये किंमतीचा कोळसा फक्त 10-12 दिवसांनी देण्यास विलंब केला, तेव्हा केंद्राने आरोप करायला सुरुवात केली. दुसरीकडे राज्य सरकारला अद्याप 35,000 कोटी रुपयांची जीएसटी रक्कम मिळालेली नाही परंतु कोणीही या विषयावर काहीही बोलत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेलाही उत्तर दिले. त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझे वैयक्तिगत मतभेद होते. पण त्यांच्या सारखा दिलदार माणूस नव्हता. त्यांनी महाराष्ट्रासाठी जे योगदान दिले आहे ते विसरता कामा नये. त्यांच्या पक्षाने जे काम केले आहे, त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या अर्थात त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा माझा आग्रह होता. माझा आग्रह असल्यामुळे सर्वांनी स्वागत केलं आणि त्याची निवड झाली. त्यामुळे उगाच कुठल्याही गोष्टींवर आक्षेप घेऊ नये, अशी माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे." दरम्यान. मुख्यमंत्र्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुकही केले.