अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची चर्चा माझ्या समोर झालीच नव्हती; देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार, शिवसेना पक्षप्रमुखांना पुन्हा धक्का
Devendra Fadnavis | (Photo Credits: Twitter /ANI)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (8 नोव्हेंबर 2019) पुन्हा एकदा शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्का दिला आहे. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद (Chief Minister) या विषयावर माझ्यासमोर कधीही चर्चा झाली नव्हती. जर ही चर्चा झाली असेलच तर ती आमचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत झाली असावी. त्याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही असा दावा देवेंद्र फडणवीस (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. तसेच, सरकार स्थापन करण्याबाबतची चर्चा भाजपकडून नव्हे तर शिवसेनेकडूनच थांबली आहे. मी स्वत: उद्धव ठाकरे यांना अनेकदा फोन केले. मात्र, त्यांनी फोन स्वीकारला नाही, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल भवन येथे जाऊन राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय निवासस्थान 'वर्षा' येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप नेते गिरीश महाजन, सुधिर मुनगंटीवार, यांसह भाजपचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

सरकार चालवत असताना सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ज्यांना सोबत घेऊन काम केले ते सोबत होते की नाही हे तुम्हाला (पत्रकारांना उद्देशून) माहिती आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला. सरकार चालवत असताना पाच वर्षांच्या कालावधीत आम्ही अनेक संकटांचा सामना केला परंतू, महाराष्ट्राचा विकासही मोठ्या प्रमाणावर झाला, असा दावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. (हेही वाचा, Maharashtra Government Formation Live News Updates: नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका विखारी: देवेंद्र फडणवीस)

या वेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी दिल्याबद्धल महाराष्ट्राच्या जनतेचे आणि मित्रपक्षांचे आभार मानले. या पाच वर्षात आपण सरकार पारदर्शीपणे चालवण्याचा प्रयत्न केला. तसे ते चालवले. या कार्यकाळात जनहिताच्या अनेक योजना राबवल्या. त्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, मेट्रोची कामं, विविध उपक्रम आणि जलस्वराज्य यांसारख्या योजना आणि कामांचा समावेश आहे.