अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत देवेंद्र फडणवीस आणि भाजपसोबत हातमिळवणी केली. शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या दोघांनीही एकत्र शपथ घेतल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बाबतीत एक वेगळाच योगायोग पाहायला मिळाला आहे.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकूण 3 गोष्टींचं साम्य आहे. हे दोन्ही नेते वेगळ्या पक्षात असले तरी त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. तसेच दोघांनी एकाच दिवशी शपथ घेतली, तर एकाच दिवशी राजीनामाही दिला.
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी झाला आहे तर अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 या दिवशी झाला. त्यामुळे दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा करण्यात येतो. त्याचसोबत दोघांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी एकत्र येऊन सत्ता स्थापनेची शपथ घेतली होती, तर 26 नोव्हेंबर 2019 रोजी दोघांनी आपापल्या पदाचा राजीनामाही दिला आहे.
दरम्यान, आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. तसेच नवाब मलिक यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीनुसार उद्धव ठाकरे हे 'महाविकासआघाडी' चे नेते तर असतीलच पण त्याहीसोबत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्रीसुद्धा असणार आहेत.