
Maharashtra Police News: महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ भारतीय पोलिस सेवा (IPS Officers) अधिकारी देवेन भारती (Deven Bharti) यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) म्हणून नियुक्ती केली. आयुक्त म्हून त्यांच्या नियुक्तीची घोषणा केल्यानंतर त्याबाबत पुष्टी करणारा अधिकृत आदेश बुधवारी (30 एप्रिल) लगेचच जारी करण्यात आला. ते 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी मुंबई पोलिसात विशेष आयुक्त म्हणून काम केले होते आणि त्यांना संयुक्त पोलिस आयुक्तपदावरून अतिरिक्त पोलिस महासंचालक (ADGP) पदावर बढती देण्यात आली होती.
पोलीस दलातील प्रदीर्घ सेवेचा अनुभव
देवेन भारती यांनी आपल्या सेवेतील कर्तव्यकाळात दहशतवादाशी संबंधित त्यांच्या कामांव्यतिरिक्त, अनेक प्रमुख गुन्हेगारी तपासांमध्ये नेतृत्व करत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. तसेच, गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी पथक (ATS) यासारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये काम केले आहे. उच्चस्तरीय तपास हाताळण्याचा त्यांचा प्रचंड अनुभव आणि यशस्वी ऑपरेशनल रेकॉर्डमुळे, देवेन भारती हे मुंबई पोलिसांमध्ये एक मजबूत नेतृत्व आणतील अशी अपेक्षा आहे कारण शहर जटिल कायदा आणि सुव्यवस्थेच्या आव्हानांना तोंड देत आहे. (हेही वाचा, Mumbai Police New Commissioner: मुंबईचा पुढचा पोलीस आयुक्त कोण? रितेश कुमार, अर्चना त्यागी की देवेन भारती?)
देवेन भारती यांच्या कारकिर्दीतील प्रमुख टप्पे
पद | तपशील |
आयपीएस बॅच | सन- 1994 |
मागील पद | विशेष आयुक्त, मुंबई पोलीस |
महत्त्वाचे कार्य | पोलीस (कायदा आणि सुव्यवस्था) विभागाचे सर्वाधिक काळ कार्यरत |
प्रमुख तपास | 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला, पत्रकार जे डे हत्या प्रकरण |
दहशतवादविरोधी कार्य | इंडियन मुजाहिदीनच्या महाराष्ट्रातील नेटवर्कचा खात्मा |
इतर पदभार | गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त, महाराष्ट्र एटीएस प्रमुख |
सेवेत ठसा उमटवलेला अधिकारी
कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे संयुक्त आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती 2015 मध्ये झाली होती आणि त्यांनी या पदावर सर्वाधिक काळ सेवा दिली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबईतील अनेक संवेदनशील प्रकरणांवर नेतृत्व केले. 26/11 मुंबई हल्ला (26/11 Mumbai Attacks), पत्रकार जे डे हत्या प्रकरण, तसेच इंडियन मुजाहिदीन चा पर्दाफाश यासारख्या घटनांमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी गुन्हे शाखा, दहशतवादविरोधी पथक (ATS) या विभागांमध्येही नेतृत्व केले आहे. मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रभावी कारभार करण्यासाठी देवेन भारती यांच्यासारख्या अनुभवी आणि सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे या शहरााची कायदा व सुव्यवस्था राखणे ही अतिशय महत्त्वाची आणि तितकीच आव्हानात्मक बाब आहे. त्यामुळे या पदावर येणाऱ्या अधिकाऱ्यावर मोठी जबाबदारी असते. त्यामुळे नवनियुक्त आयुक्त देवेन भारती यांच्या कामगिरीबाबत उत्सुकता आहे.