Mumbai Police Commissioner | (Photo credit: archived, edited, representative image)

IPS Officer Appointment: मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आपल्या पदावरुन 30 एप्रिल रोजी निवृत्ती होत आहेत. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी किंवा पुढचा पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) कोण? याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. या पदासाठी पोलीस दलातील तीन वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा आहे. ज्यामध्ये महिला आयपीएस अधिकारी अर्चना त्यागी (Archana Tyagi) यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्यासोबतच्या स्पर्धेत रितेश कुमार (Ritesh Kumar) आणि देवेन भारती (Deven Bharti) या दोन बड्या अधिकाऱ्यांची नावेही चर्चेत आहेत. दरम्यान, त्यागी यांचे नाव अधिक चर्चेत आहे. त्यांची या पदावर नियुक्ती झाल्यास ती ऐतिहासिक मानली जाईल. कारण त्यांच्या रुपात शहराच्या आयुक्त पदावर प्रथमच एका महिलेला संधी मिळणार आहे. दरम्यान, कोणाच्याच नावाची अधिकृत घोषणा झाली नाही. ही घोषणा पुढच्या काहीच तासांमध्ये होणे अपेक्षीत आहे.

महिलेस आयुक्तपदी संधी?

प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांमध्ये आयपीएस अर्चना त्यागी यांचे नाव अधिक चर्चेत आहे. दावा केला जात आहे की, महाराष्ट्र सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्चना त्यागी यांच्या नावाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत. जर ही निवड झाली, तर मुंबई पोलिस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेची आयुक्तपदी निवड होईल.

या आधी दोन महिलांना वरीष्ठ पदावर संधी

या आधीही दोन महिला अधिकाऱ्यांनी राज्याच्या उच्च प्रशासनात यश मिळवले आहे – सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव झाल्या आहेत, तर रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी (DGP) नियुक्त झाल्या.

अर्चना त्यागी – 'लेडी सुपरकॉप'

अर्चना त्यागी या 1993 बॅचच्या अधिकारी आहेत. ज्या सध्या महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत आहेत. त्या त्यांच्या कार्यक्षमतेसाठी 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या सेवाकारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत.

सदानंद दातेंचे नाव मागे?

सुरुवातीला नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (NIA) महासंचालक सदानंद दाते यांचे नाव देखील चर्चेत होते. मात्र, ते सध्या पाकिस्तानातील तहावूर राणा प्रकरण आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने केंद्र सरकार त्यांना सोडण्यास इच्छुक नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे अर्चना त्यागी यांचं नाव अधिक बळकट झालं आहे.

गेल्या काही दिवसांत उच्चस्तरीय बैठकांमधून अर्चना त्यागी यांचं नाव पुढे आलं असून, त्यांचा नियुक्तीबाबतचा अधिकृत निर्णय येत्या 48 तासांत जाहीर होण्याची शक्यता आहे. जर त्यांची नियुक्ती झाली, तर ती मुंबई पोलिस दलासाठी ऐतिहासिक क्षण ठरेल आणि महिला अधिकार्‍यांसाठी प्रेरणादायी ठरेल.