तब्बल चार तास खलबतं केल्यावर मुहूर्त ठरला, अजीत पवार म्हणतात 'उद्या होणार मंत्रिमंडळ खातेवाटप'
Deputy Chief Minister Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर गेले प्रदीर्घ काळ रंगलेल्या खातेवाटपाच्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party), राष्ट्रीय काँग्रेस (Congress Party) या तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये आज (बुधवार, 1 जानेवारी 2020) एक बैठक पार पडली. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीनंतर मंत्रिमंडळाचे खातेवाटप उद्या (गुरुवार, 2 जानेवारी 2020) जाहीर होईल असे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ खातेवाटपावरुन सुरु असलेल्या वादाच्या चर्चा निरर्थक असल्याचे सांगत खातेवाटपावरुन मंत्रिमंडळामध्ये कोणताही वाद नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, हे सरकार तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केले आहे. त्यामुळे दीर्घकालीन वाटचाल ध्यानात घेऊन भविष्यात अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी या बैठकीत चर्चा झाली. तसेच, या बैठकीत पालकमंत्र्यांबाबत चर्चा झाल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. (हेही वाचा, खातेवाटपाचा घोळ कायम असतानाही राज्यमंत्री बच्चू कडू लागले कामला; दोन अधिकाऱ्यांचं निलंबन)

दरम्यान, उद्या म्हणजेच गुरुवारपर्यंत खातेवाटप जाहीर करण्यात अडचण नाही. त्यामुळे उद्या मंत्री आणि त्याला मिळणाऱ्या खात्याची घोषणा केली जाईल. शिवसेना मंत्र्यांची यादी मुख्यमंत्र्यांकडे आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्र्यांची नावे व त्यांच्या खात्याबाबतची यादी आपण मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केल्याची माहिती अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खातेवाटपावरुन कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचेही पवार यांनी सूचित केले.