Bacchu Kadu | (Photo Credit: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. मंत्रिमंडळ विस्तार पार पडला तरी अद्याप खातेवाटप होणे मात्र अद्याप बाकी आहे. त्यामुळे ठाकरे मंत्रिमंडळातील अनेक मंत्री बिनखात्याचे मंत्री म्हणून वावरत असले तरी, राज्यमंत्री बच्चू कडू (State Minister Bacchu Kadu) यांनी मात्र कामाला सुरुवात केली आहे. राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मंत्री झाल्यानंतर अमरावती (Amravati) येथे केलेल्या पहिल्याच दौऱ्यात तहसील कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना दणका दिला. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तहसील (Daryapur Tehsil Office) कार्यालयाला बच्चू कडू यांनी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी कामात हालगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत निरीक्षण अधिकारी सपना भोवते आणि नायब तहसीलदार प्रमोद काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

निरीक्षण अधिकारी सपना भोवते आणि नायब तहसीलदार प्रमोद काळे यांच्यावर नागरिकांना रेशन कार्ड न दिल्याप्रकरणी कारवाई करत मंत्री बच्चू कडू यांनी निलंबनाचे आदेश दिले. विशेष म्हणजे आमदार बच्चू कडू यांच्याकडे मंत्री म्हणून कोणत्या खात्याचा कारभार आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतू, त्यांनी आपल्या पहिल्याच दौऱ्यात दोन अधिकाऱ्यांना दणका दिला आहे.

प्राप्त माहितीनुसार, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज (बुधवार, 1 जानेवारी 2020) दुपारी 3 वाजणेच्या सुमारास दर्यापूर तहसील कार्यालयाला भेट दिली. राज्यमंत्र्यांनी अचानक भेट दिल्याने तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे राज्यमंत्री कडू यांनी तातडीने आढावा बैठकीचे आयोजन करा असे कार्यालयातील अधिकाऱ्यांना सांगितले. (हेही वाचा, पालघर: शिवसेनेने बेईमानी केली, वर्गात पहिला आलेल्या मुलाला बाहेर बसवलं; देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका)

आढावा बैठकीत बच्चू कडू यांनी तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या कामाची माहिती घेतली. या बैठकीत बैठकीत संजय गांधी निराधार योजना आणि पुरवठा विभाग या दोन विषयांवर जवळपास 60 मिनीटे चर्चा झाली. या वेळी अनेक वेळा कार्यालयात हेलपाटे मारुनही आपले रेशन कार्ड मिळण्याचे काम झाले नाही अशी तक्रार काही लाभार्थ्यांनी केली. या वेळी बच्चू कडू यांनी रेशनकार्ड देण्याची जबाबदारी असलेल्या दोन अधिकाऱ्यांकडे विचारणा करत त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले.