जळगाव: कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वागताला जमली गर्दी, झाली चेंगराचेंगरी; 2 महिला जखमी
Gulabrao Patil | (Photo Credit: Facebook)

शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे महाविकासआघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन दोन महिला जखमी झाल्या. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी (1 जानेवारी 2019) ही घटना घडली. कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच जळगाव (Jalgaon) येथे आले आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि समर्थक, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. या गर्दीत चेंगराचेंगरीची घटना घडली. जखमी झालेल्या दोन्ही महिला शिवसेना पदाधिकारी असल्याचे समजते.

आमदार गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारमध्ये गुलाबराव यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. गीतांजली एक्सप्रेस या गाडीने गुलाबराव पाटील हे मुंबईतून जळगावला पोहोचले. गुलाबराव यांचे स्वागत करण्यासाठी असंख्य शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकारी जळगाव रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.

गुलाबराव देवकर यांचे गीतांजली एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. पाटील हे रेल्वे स्थानकातून बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच्या भरात गोंधळ झाला. या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिला पदाधिकारी जखमी झाल्या. मंगला बारी आणि शोभा चौधरी असे या महिला पदाधिकाऱ्यांची नावे असल्याचे समजते. दरम्यान, घडलेली घटना ध्यानात येताच इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांना सुखरुप बाहेर काढले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. (हेही वाचा, पालघर: शिवसेनेने बेईमानी केली, वर्गात पहिला आलेल्या मुलाला बाहेर बसवलं; देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका)

दरम्यान, कार्यकर्त्यांच्या गराड्यात स्वत: मंत्री गुलाबराव देवकर हे देखील अडकले. मात्र, त्यांच्या ताफ्यात सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी पाटील यांच्याभोवती सुरक्षा कडे तायार केले. त्यामुळे कार्यकर्त्यांची गर्दी गुलाबराव यांच्या अंगावर येऊ शकली नाही. काही वेळात गर्दी कमी झाली मग पाटील यांना हळूच बाहेर काढण्या आले. गर्दीची पांगापांग झाल्यावर पाटील यांच्या मिरवणुकीस सुरुवात झाली.