Delhi Gold Smuggling Case: दिल्ली येथील 83 किलो सोने तस्करी प्रकरणाचे सांगली कनेक्शन, NIA पथकाकडून आटपाडी, खानापूर येथे काही जणांची चौकशी
Gold | Representational Image (Photo Credits: Pixabay)

दिल्ली येथील रेल्वे स्टेशनवरुन साधारण दोन महिन्यांपूर्वी तब्बल 83 किलो सोने जप्त (Delhi Gold Smuggling Case) करण्यात आले होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर सोने सापडल्याने एकच खळबळ उडाली होते. या प्रकरणाची दखल राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने घेतली होती. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात आता सांगली कनेक्शन पुढे आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात सांगलीतील खानापूर (Khanapur), आटपाडी (Atpadi) या भागातील काही लोक गुंतले असल्याचेही पुढे येत आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेशन शाखा (NIA) पथकाने या भागातील काही संशयीतांच्या घरावर छापे टाकून झडती घेतली. तसेच, चौकशी केल्याचे समजते.

एनआयएने टाकलेल्या छाप्यात काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागू असूनत ती जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.जप्त करण्यात आलेले सोने हे तस्करी करुन नेपाळ, भूतान आणि म्यानमारमध्ये पाठवले जाणार होते. हे सोने या देशात नेमके कोणाकडे पाठवले जाणार होते याबाबत चौकशी सुरु आहे. (हेही वाचा, Honest Auto Rickshaw Driver: तब्बल 11 तोळे सोने, 20 हजार रुपयांची रोख रक्कम केली परत, पुणे येथील रिक्षाचालक विठ्ठल मापारे यांचा प्रामाणिकपणा)

प्राप्त माहितीनुसार, सोने तस्करी करणाऱ्या रविकिरण गायकवाड, पवन कुमार गायकवाड, योगेश हणमंत रुपनर, अभिजित बाबर, सद्दाम पटेल, अवधूत अरुण विभूते, सचिन आप्पासो हसबे, दिलीप लक्ष्मण पाटील यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व जण आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील आहेत.

या प्रकरणाच्या तपासासाठी एनआयएचे 10 अधिकारी दिल्ली येथून सांगलीला आले. जिल्हा पोलिसांनी त्यांना आवश्यक ती सर्व सेवा आणि मदत पुरवली. त्यानंतर एनआयएने पुढील कारवाई केली.