अतिवृष्टी, निसर्ग चक्रीवादळ यामुळे आधीच हवालदिल झालेला बळीराजा आता गारपीट आणि अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडला आहे. मागील 2 दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीटीने हजेरी लावली. यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सर्व जिल्हा कृषी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पंचनामे आल्यानंतर अधिवेशनात नुकसान भरपाई बाबत निर्णय घेतले जातील, अशी माहिती विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी दिली आहे.
राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. नांदेड, लातूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, अकोला, परभणी, भंडारा या जिल्ह्यांसह अनेक भागांमध्ये देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे हरभरा, केळी, गहू, ज्वारी, भुईमूग, द्राक्षं या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.
मागील वर्षी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारकडून 10 हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी साडेपाच कोटींची मदत शेतीसाठी देण्यात आली असून उर्वरित रक्कम बांधकाम आणि उर्जा विभागाला देण्यात आली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही नुकसान भरपाई देण्यात येणार असून यासंबंधितचा निर्णय अधिवेशनात घेतला जाणार आहे.
दरम्यान, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्चपासून सुरु होत आहे. तर 8 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मात्र कोरोना व्हायरस संकटामुळे अधिवेशनाच्या कार्यकाळाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. परंतु, यावर आरोग्य विभागाने चार दिवस कामकाज आणि तीन सुट्टी या सुत्राचा पर्याय शोधला आहे.