मागील 10 दिवस दापोली तिहेरी हत्याकांडामधील आरोपींचा शोध घेणार्या रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. 3 वृद्ध महिलांच्या हत्येप्रकरणी रामचंद्र वामन शिंदे या 53 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामचंद्रने खूनाची कबुली दिली आहे. या हत्या आर्थिक कारणांवरून झाल्या आहेत. मृतांपैकी सत्यवती ही वृद्ध महिला गरजूंना व्याजावर पैसे देत होती. सध्या तिच्याकडून किती पैसे देण्यात आले आहेत याचा तपास सुरू आहे.
यंदा संक्रांतीला म्हणजे 14 जानेवारी दिवशी रत्नागिरीच्या दापोलीमधील मौजे वणौशी मध्ये हे हत्याकांड समोर आले. यामध्ये रूक्मिणी उर्फ इंदूबाई पाटणे, पार्वती परबत पाटणे आणि सत्यवती परबत पाटणे या तिघींचा खून करण्यात आला आहे. डोक्यात घाव आणि अर्धवट जळलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह आढळल्याने सारा तालुका हादरला होता.
महिलांना ठार मारून त्यांच्या अंगावरील 1 लाख 62 हजार 150 रूपये आणि घरातील सोन्याचे दागिने, पैसे घेऊन चोर फरार झाला होया. याप्रकरणी दापोली पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. दरम्यान मृतांपैकी सत्यवती पैसे उधार देत असल्याने कोणी जाणत्या व्यक्तीने हा खून केला असावा असा अंदाज बांधून तपास सुरू झाला आणि मुंबईत राहणार्या रामचंद्र शिंदे पर्यंत पोलिस पोहचले. हे देखील नक्की वाचा: Nagpur Acid Attack: नागपुरात महिलेच्या चेहऱ्यावर फेकले अॅसिड, आरोपीला अटक .
गुन्ह्याच्या ठिकाणी लोकवस्ती कमी असल्याने आणि आरोपीनेही पुरावा मागे न ठेवल्याने या हत्याकांडाची उकल करण्याचे मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. कसून चौकशी करताना पोलिसांचा शिंदेवर संशय बळावला. रामचंद्र शिंदेची अधिक चौकशी केल्यावर त्याला योग्य व घटनेशी संयुक्तिक उत्तरं देता न आल्याने पोलिसांनी त्याचा तपास केला. त्याच्या संशयित हालचाली हेरल्या. पुढे शिंदे याने गुन्ह्याची कबुली दिली. कर्जबाजारी झालेल्या शिंदेला पैशांची गरज होती ती या घरातून पूर्ण होईल असं वाटल्याने सत्यवतीची हत्या केली आणि साक्षीदार राहू नये म्हणून अन्य दोघींचीही निर्घुणपणे हत्या केली.