'भाजपशासित राज्यात दलित सुरक्षित नाहीत, पंतप्रधानांनी स्वत: दलितांच्या सुरक्षेची हमी द्यावी'- NCP
NCP (Photo Credits-File Image)

देशात दलितांच्या (Dalit) असुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) देशात एससी-एसटी वर्गातील लोक सुरक्षित नसल्याचा आरोप केला आहे. या समुदायाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिकरित्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी पक्षाने केली आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील माजी ग्रामप्रमुखाच्या अटकेबाबत हे विधान केले आहे.

या माजी गावप्रमुखाने जाहीर केले होते की, जर दलित समाजातील व्यक्ती त्याच्या शेतात शिरली तर त्याला 50 वेळा बुटांनी मारले जाईल आणि 5,000 रुपये दंड केला जाईल. पोलिसांनी मंगळवारी सांगितले होते की, कुंवरपालचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तो खुर्द गावातील दलितांच्या घराबाहेर अशा घोषणा करताना दिसत आहे. त्यानंतर त्याला अटक झाली.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना तपासे म्हणाले की, भाजपशासित राज्यांमध्ये दलित सुरक्षित नाहीत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दलितांना वैयक्तिकरित्या सुरक्षेचे आश्वासन द्यावे. भाजपच्या इशाऱ्यावर देशात दलितांवरील अत्याचार वाढल्याचा आरोपही त्यांनी केला. हा 'सबका साथ, सबका विकास' आहे का?  असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हा नारा भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिला होता. (हेही वाचा: शरद पवारांनी केंद्राची चिंता करणे सोडून महाराष्ट्रासमोरील समस्यांवर लक्ष केंद्रित करावे, देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य)

असेही मानले जात आहे की, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीने भाजपवर हा आरोप केला आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा दलित वर्गातील असल्याने त्यांच्याशी मुंबईत गैरवर्तन करण्यात आल्याचे आठवले यांनी मंगळवारी सांगितले होते. त्यांच्या या आरोपाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीने पलटवार केला. दरम्यान, सीएम योगी आदित्यनाथ यांनी मुंबईमध्ये युपी सरकारचे ऑफिस बांधण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना तपासे म्हणाले की, ‘मुंबईत कार्यालय बांधून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होत आहे.’