Dahi Handi 2021: '31 ऑगस्टला साजरी होणार विश्वविक्रमी दही हंडी'; MNS ने केली घोषणा, सरकारची चिंता वाढली
दहीहंडी उत्सव (Photo Credits-Twitter)

देशातील कोरोना विषाणू (Coronavirus) संकटामुळे राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी सर्व सण आणि उत्सव साजरे करण्यास बंदी घातली आहे. यामुळेच गेल्या वर्षी दही हंडीच्या (Dahi Handi) उत्सवावरही प्रतिबंध लागू करण्यात आला होता. परंतु यंदा राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पक्ष मनसे (MNS) कोणत्याही परिस्थितीत दही हंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम आहे. मनसे नेते अभिजित पानसे यांनी आपल्या फेसबुक पेजवर याची घोषणा केली आहे. अभिजीत पानसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 31 ऑगस्ट रोजी जागतिक विक्रम करणारी दही हंडी साजरी केली जाईल.

ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही अभिजित पानसे यांच्या या घोषणेचे समर्थन केले आहे. दही हंडीचा सण साजरा करण्यासाठी मनसेतर्फे तयारीही सुरू करण्यात आली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनी दही हंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन लोकांना केले जात आहे. मनसेची ही तयारी पाहता राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. मनसेने दही हंडीचा उत्सव सार्वजनिकपणे साजरा केला तर, ठाकरे सरकारसाठी एक नवी चिंता निर्माण होऊ शकेल.

मनसेने मोठ्या प्रमाणात दही हंडी साजरा करण्याची घोषणा करून राज्य सरकारची चिंता वाढविली आहे. दही हंडी उत्सव महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. गणेशोत्सवासोबत हा उत्सवदेखील त्याच उत्साहात साजरा केला जातो. ठाण्यातील दही हंडीला वेगळे महत्त्व आहे. दरवर्षी ठाण्यासह मुंबई, पालघर, नाशिक यासारख्या दूरदूरच्या ठिकाणाहून ठाण्यात गोविंदा पथके येतात. (हेही वाचा: कोविड-19 तिसरी लाट, निर्बंध शिथिलीकरण यासंदर्भात काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे? जाणून घ्या)

दरम्यान, मागील वर्षी दही हंडी उत्सव कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता. यावेळी कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे, तिसर्‍या लाटेच्या भीतीमुळे आणि कोरोना संक्रमणाची संख्या पुन्हा एकदा वाढू लागल्याने राज्य सरकार विचारपूर्वक पावले टाकत आहे. अशा परिस्थितीत यंदा राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि पोलीस या बाबत काय निर्णय घेतात हे पाहने महत्वाचे ठरणार आहे.