
मुंबई सह ठाणे, कल्याण- डोंबिवली परिसरात दहीहंडीच्या निमित्त दरवर्षी मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र यंदा महाराष्ट्रात ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे बड्या आयोजकांच्या अनेक मानाच्या हंड्या रद्द करण्यात आल्या आहेत.एकीकडे हंडीला लागणारा खर्च पुरग्रस्तांच्या मदतीसाठी वारपरण्याचा आयोजकांचा निर्णय कौतुकास्पद असला तरी यामुळे साहजिकच मागील दोन तीन महिने हंडीचा सराव करणारे गोविंदा काहीसे नाराज झाले आहेत.
यंदा मुंबईत दादर, कुर्ला, गिरगाव येथे राजकीय नेत्यांनी आयोजित करत असलेल्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन रद्द करण्यात आले आहेत.यानुसार गिरगावातील शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ , घाटकोपर येथील राम कदम, वरळीमधील आमदार प्रकाश सुर्वे, सचिन अहिर, बोरिवली पूर्वेला देवीपाडा येथील आमदार प्रकाश सुर्वे, अंधेरी येथील संजय निरुपम यांच्या हंडीचे आयोजन रद्द करण्यात आलेले आहे. तर ठाण्यात देखील खासदार राजन विचारे, कल्याण मध्ये मनसे च्या यांच्या हंडीचे आयोजन रद्द करण्यात आले आहे.(Thane Dahi Handi 2019: दही हंडी निमित्त डॉ. काशिनाथ नाट्यगृह चौकातील वाहतूक मार्गात बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग)
याशिवाय अनेक आयोजकांनी गोविंदा आणि सणाचा उत्साह लक्षात घेत पारंपरिक पद्धतीने हंडीचे आयोजन केले आहे यामध्ये ठाणे येथील टेंभी नाका, वर्तकनगर मधील संस्कृती प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान या हंड्यांचा समावेश आहे. डोंबिवली मधील रवींद्र चव्हाण यांच्या हंडीची बक्षिसाची रक्कम ही पूरग्रस्तांसाठी दिली जाईल. तर ठाण्यात सुद्धा हंडीच्या रक्कमेतील अर्धा भाग हा पुरग्रस्तनपैकी दहा कुटुंबाना मदत स्वरूपात दिला जाईल अशी घोषणा मनसेच्या अविनाश जाधव यांनी केली. तसेच यंदा आयोजकांसोबतच गोविंदानी सुद्धा आपल्या बक्षिसाची रक्कम मदत म्हणून देण्याचे ठरवले आहे.
दरम्यान, यंदा विधानसभा निवडणुकांच्या पार्शवभूमीवर खरंतर दहिहंडीचे मोठे सोहळे आयोजित केले जातील अशी गोविंदा पथकांची अपेक्षा होती मात्र पुरामुळे या सर्व इच्छा कोलमडून पडल्या आहेत. आयोजकांनी हंडी रद्द करण्यापेक्षा कमी बक्षीस ठेऊन जरी हंडीचे आयोजन केले तरी निदान पथकांची मेहनत वाया जाणार नाही आणि सणाचा उत्साहअबाधित राहील असे मत गोविंदानी मांडले आहे.