Tutari Express Special: कोकण रेल्वेमार्गावर दादर-सावंतवाडी-दादर रेल्वे 25 सप्टेंबरपासून नियमित धावणार; इथे पहा वेळापत्रक, थांबे आणि बुकिंग कसे कराल?
Konkan Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

कोरोना व्हायरच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील 6 महिन्यांपासून नियमित धावणार्‍या अनेक रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता कोकणवासीयांसाठी एक खूषखबर आहे. 25 सप्टेंबर पासून आता कोकण रेल्वेमार्गावर दादर-सावंतवाडी-दादर तुतारी एक्सप्रेस ( Dadar - Sawantwadi Road - Dadar Tutari Express Special ) पुन्हा धावायला लागणार आहे. राज्यात मनमाड एक्सप्रेस नंतर तुतारी एक्सप्रेस ही दुसरी स्पेशल ट्रेन नियमित सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या सणावाराला कोकणात जाणार्‍यांसाठी ही मोठी खूषखबर आहे. दरम्यान आज (24 सप्टेंबर) पासून तुतारी एक्सप्रेससाठी रेल्वे बुकिंग सुरू करण्यात आले आहे.

तुतारी एक्स्प्रेस मधून केवळ आरक्षण असणार्‍या प्रवाशांना ये-जा करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. तसेच ही रेल्वे 31 ऑक्टोबर पर्यंत मान्सूनच्या वेळापत्रकानुसार तर 1 नोव्हेंबरपासून नॉन मॉन्सून वेळापत्रकानुसार चालवली जाणार आहे. CSMT-Manmad Special Train Time Table: सीएसएमटी- मनमाड दरम्यान 12 सप्टेंबरपासून धावणार स्पेशल ट्रेन; इथे पहा वेळापत्रक.

तुतारी एक्सप्रेसचं वेळापत्रक

31 ऑक्टोबर पर्यंत तुतारी एक्सप्रेस दादरहून दररोज रात्री 12.05 वाजता सुटणार आणि दुसर्‍या दिवशी सावंतवाडीला दुपारी 12.20 ला पोहचणार. तर 1 नोव्हेंबर पासून हीच गाडी रात्री 12.05 ला सुटणार मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी 10.40 ला पोहचेल.

सावंतवाडी रोड वरून देखील 31 ऑक्टोबर पासून ही गाडी संध्याकाळी 5.30 ला सुटेल आणि दादरला सकाळी 6.45 ला पोहचेल. तर 1 नोव्हेंबर पासून संध्याकाळी 6.50 ला सुटेल आणि मुंबईला 6.45 ला पोहचेल.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबे असतील?

दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

दरम्यान प्रवाशांना कोकणा रेल्वे मार्गावर धावणार्‍या तुतारी एक्सप्रेसचं तिकीट बुकिंग आयआरसीटीसी च्या वेबसाईटवर, तिकीट खिडकीवर उपलब्ध असेल. तसेच रेल्वे प्रशासनाकडून प्रवासादरम्यान दिल्या जाणार्‍या सूचनांचं, विशेष नियमावलींचं पालन करणं बंधनकारक असेल.