Cyrus Mistry Last Rites: वरळी स्मशानभूमीत आज साइरस मिस्त्री यांच्यावर होणार अंत्यसंस्कार
Cyrus Mistry | (Photo Credit - ANI/Twitte)

उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख साइरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघाती निधनानंतर आज (6 सप्टेंबर) त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. वरळी मध्ये स्मशानभूमीत सायरस मिस्त्री यांच्यावर अंत्यविधी होतील. रविवारी अहमदाबाद येथून मुंबई कडे प्रवास करताना पालघर जवळ सायरस मिस्त्री यांच्या गाडीला अपघात झाला होता. मर्सिडीज गाडीने प्रवास करत असताना चार जण गाडीत होते. त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोन जणांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान सायरस मिस्त्री हे उमदे, मितभाषी आणि यशस्वी उद्योगपती होते. रतन टाटा निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी सायरस मिस्त्री यांची निवड झाली होती. पण नंतर काही वर्षांतच त्यांना पदावरून हटवण्यात आले होते. या प्रकाराबाबत ते न्यायालयात गेले होते पण निर्णय त्यांच्या बाजूने लागला नाही.

पालघर मधील अपघातानंतर सायरस मिस्त्री यांचा मृतदेह जे जे रूग्णालयामध्ये ठेवण्यात आला होता. आज त्यांचा भाऊ आणि दोन मुलं भारतामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर 11 च्या सुमारास अंत्यविधी होणार आहेत.

डॉ. अनायता पांडोले वाहन चालवत होत्या. गाडी वेगात होती आणि खड्डा चुकवण्याच्या नादात ती डिव्हायडरला आदळली. सायरस मागच्या सीट वर बसले होते त्यांनी सीट बेल्ट लावला असता तर कदाचित वाचू शकले असते असा प्राथमिक अंदाज मांडण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हे देखील नक्की वाचा: Cyrus Mistry यांच्यासोबत प्रवास करणार्‍या Dr Anahita Pandole आणि त्यांचे पती Darius Pandole यांना उपचारासाठी मुंबईच्या HN Reliance Foundation Hospital मध्ये हलवले.

साइरस पलोनजी मिस्त्री यांचा जन्म (4 जुलै 1968) व्यापारी कुटुंबात झाला. त्यांनी मुंबई यथील कॅथेड्रल एवं जॉन कॉनन स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी सिव्हील इंजिनियरींगमध्ये बीएस सोबत इंपीरिएल कॉलेज लंडन येथून पदवी घेतली. लंडन येथून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण आणि लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी विज्ञान विषयातील पदवी घेतली. पालोनजी ग्रुप साठी 2022 मधील सायरस मिस्त्री यांचं हा दुसरा मोठा वैयक्तिक फटका आहे. जून 2022 मध्ये सायरस यांचे वडील पालोनजी मिस्त्री यांचे वयाचे 93व्या वर्षी निधन झाले होते.