Cyclone Tauktae चे संकट; सिंधुदुर्गमध्ये आज तर रायगडमध्ये उद्या रेड अलर्ट, पहा पुढील 5 दिवसांचा IMD चा अंदाज
Cyclone | Image For Representation (Photo Credits: PTI)

अरबी समुद्रात घोंगावणारं तौक्ते चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) अतितीव्र स्वरुप धारण केले असून ते महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील किनारपट्टीकडील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादाळाचा तडाखा कोकण किनारपट्टीवरील रायगड (Raigad) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यांना अधिक बसण्याचा संभव आहे. मुंबई वेधशाळेकडून पुढील 5 दिवसांसाठी विविध जिल्ह्यांमधील हवामानाचा अंदाज वर्तवला असून पावसाच्या तीव्रतेनुसार रेड (Red), ऑरेंज (Orange), येल्लो (Yellow) आणि ग्रीन (Green) अलर्ट जारी करण्यात आले आहेत. (Cyclone Tauktae: तौकक्ते चक्रीवादळामुळे हाहाकार, कर्नाटकात 4 जणांचा मृत्यू)

16 मे अलर्ट:

16 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसासह रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसासह येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार असून येल्लो आणि ग्रीन अलर्ट जारी केला आहे.

पहा ट्विट:

17 मे अलर्ट:

17 मे रोजी रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रत्नागिरी, मुंबई आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होणार असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असून येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर राज्यातील  इतर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

18 मे अलर्ट:

18 मे पर्यंत चक्रीवादळ गुजरातला धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या दिवशी पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसासह ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असून ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.

18 मे नंतर तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव कमी होऊन राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील प्रशासनाला सर्तकतेचा इशारा दिला असून मनुष्यबळ, साधनसामुग्री तयार ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. मुंबईतही चक्रीवादाळाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. किनारपट्टीजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून घराबाहेर न पडता काळजी घेण्याचे आवाहन केले गेले आहे.