क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) असलेल्या बिटकॉईन Bitcoin) गुंतवणुकीच्या मागे धावणाऱ्या वसई Vasai) येथील एका व्यापाऱ्याला 10 लाख रुपयांना भुर्दंड बसला आहे. या व्यापाऱ्याने मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले 10 लाख रुपये बिटकॉईनमध्ये गुंतवले. कमी वेळात जास्त पैसा मिळेल या आशेने त्याने ही गुंतवणूक केली. पण, झाले भलतेच या व्यापाऱ्याचे पैसे बुडाले. आता घरी जाऊन बायकोला काय सांगायचे? या विचाराने तो घाबरला. त्याने 10 लाख रुपयांच्या लुटीचा बनाव रचला. मात्र, पोलिसांनी काही वेळातच त्याचा बनाव उघडकीस आणला. सुभंत यशवंत लिंगायत असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. तो विरार मधील होलसेल व्यापारी आहे.
घटना आहे वसई विरार येथील पापडी परिसरातील. येथील एका व्यापाऱ्याने पोलिसांना माहिती दिली की, 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास वसईच्या साई सर्व्हिस येथे रिक्षा थांबवून रस्ता ओलांडताना एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या हातातील 10 लाख रुपयांची रोखड असलेली बॅग घेऊन पळ काढला. आपण हे पैसे घेऊन कार खरेदी करण्यासाठी आणि यातील काही पैसे बोरिवली येथील व्यापाऱ्यांना देण्यासाठी निगालो होतो असेही त्याने सांगितले. रक्कम मोठी असल्याने तसेच, हा जबरी चोरीचा प्रकार असल्याने पोलीस सतर्क झाले. त्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. तापासास सुरुवात केली. मात्र, घडलेल्या घटनेबाबत कोणताही पुरावा पोलिसांना मिळू शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी व्यापाऱ्याची उलटतपासणी केली. (हेही वाचा, Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी Bitcoin, Ethereum खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी घ्या जाणून)
पोलिसांनी विचारलेल्या उलटसुलट प्रश्नांपुढे व्यापाऱ्याची भंबेरी उडाली. त्याने पोलिसांना नेमके काय घडले याबाबत माहिती सांगितली. त्याने पोलिसांना सांगितले की, येत्या 8 डिसेंबर रोजी त्याच्या मुलीचे लग्न आहे. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी 10 लाख रुपये जमा करुन ठेवले होते. हे पैसे त्यांनी अधिक पैशांच्या मोहासाठी बिटकॉईनमध्ये गुंतवले. पण हे पैसे बुडाले. त्यामुळे घरी जावून आता बायकोला काय उत्तर द्यायचे या प्रश्नाने तो घाबरले. त्यामुले त्याने जबरी चोरीचा बनाव रचला. पोलिसांनी व्यापाऱ्याचा हा बनाव स्टेशन डायरीमध्ये नोंद केला आहे. नंतर समज देऊन पोलिसांनी या व्यापाऱ्याला सोडून दिले आहे.