Crop Damage In Maharashtra: पावसामुळे महाराष्ट्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान; तब्बल 7 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांना फोन
Indian Farmers | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या काही भागात सतत पाऊस (Maharashtra Rains) पडत आहे. यामुळे उभ्या पिकांचे खूप नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, सुमारे 1.98 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये उगवलेले पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरीही सातत्याने सरकारकडे मदतीची मागणी करत आहेत. सरकारच्या निवेदनानुसार आतापर्यंत 7 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना पिकाच्या नुकसानीची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून गेल्या काही दिवसांपासून सक्रिय आहे.

नांदेड, परभणी, रायगड, पालघर, अकोला, धुळे, हिंगोली, पुणे, सांगली, कोल्हापूर, बुलढाणा, जळगाव, सोलापूर, नाशिक, उस्मानाबाद, लातूर आणि बीडमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, भाजीपाला आणि कांद्यासह 1.98 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पुणे, सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागातील ऊस पिकेही अनेक दिवसांपासून पाण्या खाली आहेत.

महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तालयाचे अधिकारी विनयकुमार आवटे यांनी पीटीआयला सांगितले की, 1 ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून एकूण 2,56,985 कॉल्स आले होते ज्यात अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली. 1 सप्टेंबरपर्यंत अशा कॉलची संख्या 4,15,747 पर्यंत वाढली आणि 9 सप्टेंबर रोजी 5,53,491 वर पोहोचली. गेल्या दोन दिवसात अशा कॉल्सची संख्या सात लाखांच्या पुढे गेली आहे. सात लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना फोन करून चालू पावसाळ्यात जास्त पाऊस आणि त्यामुळे पिकाच्या नुकसानीची माहिती दिली आहे. (हेही वाचा: Nagpur ने वाढवले राज्याचे टेंशन; पुण्याला प्रशिक्षणासाठी आलेल्या 12 पोलीस कर्मचाऱ्यांना Covid-19 ची लागण)

पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी वैयक्तिकरित्या शेतांना भेट देऊन नुकसानीचे आकलन करणे आवश्यक आहे आणि त्यांच्या अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळेल. विनयकुमार म्हणतात, हे आकडे आणखी वाढू शकतात. तक्रारींचा संपूर्ण अहवाल सोमवार, 13 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होईल. पिकांच्या नुकसानीव्यतिरिक्त, शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील माती वाहून जाणे, गुरांच्या गोठ्यांचे नुकसान आणि इतर समस्यांबाबत तक्रारी केल्या आहेत. मराठवाडा विभागात मुसळधार पावसानंतर शेतकऱ्यांच्या फोनच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.