Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काटा काढल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात (Crime News Chandrapur) उघडकीस आली आहे. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील बल्लापूर शहरात ही घटना घडली. या घटनेत पतीच्या हत्येसाठी (Husband Murder) चक्क पत्नीनेच प्रियकरास सुपारी दिल्याचा प्रकार पोलीस तपासात पुढे आला आहे. विवाहबाह्य संबंधातून (Extra Marital Affair) ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला नदीतील पाण्यात बुडवले आणि त्याचा जीव घेतला. त्यानंतर अपघात भासविण्यासाठी तो पुलावरुन नदीत दुचाकीसह कोसळला असा बनाव रचला.

दरम्यान, वर्धा नदीत एक तरुण दुचाकीसह नदीत कोसळल्याची माहिती पोलिसांना गुरुवारी रात्र प्राप्त झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने बचाव कार्य सुरु करत तरुणाची दुचाकी बाहेर काढली. नदीच्या पाण्याचा प्रवाह अधिक वेगाने सुरु असल्याने तरुणास शोधण्यास विलंब लागत होता. अखेर दुसऱ्या दिवशी या तरुणाचा मृतदेहच पोलिसांना सापडला. पंचनामा केल्यावर प्राथमिक चौकशीत हा अपघात असावा असा पोलिसांचा कयास होता. मात्र, अधिक खोलवर तपास केल्यानंतर पोलिसांचा हा कयास चुकीचा ठरला. तरुणाचा मृत्यू अपघातामुळे नसून ती हत्या असल्याचे पुढे आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर निषाद असे मयत तरुणाचे नाव आहे. रामेश्वर याची पत्नी सुमन हिचे शेजारीच राहणाऱ्या सुरज सोनकर या तरुणासोबत विवाहबाह्य संबंध होते. पत्नीच्या प्रेमसंबंधाबाबत रामेश्वर याला समजले होते. त्यामुळे या विवाहबाह्य संबंधावरुन दोघांमध्ये नेहमी कडाक्याचे भांडण होत असे. दरम्यान, रामेश्वरने सुरज सोनकर यालाही आपल्या पत्नीपासून दूर राहा अशी समज दिली. इतके होऊनही सुमन आणि सुरज यांच्या संबंधात कोणताही दुरावा आला नाही. उलट आपल्या प्रेमसंबंधात पती रामेश्वर याचा अडथळा येतो आहे हे समजल्याने सुमन आणि सुरज यांनी कट रचला. रामेश्वर याचा काटा काढण्याचे ठरवले. (हेही वाचा, Amravati Crime: पोटावर बॅग मारल्याने महिलेचा गर्भपात; अमरावती शहरातील पांढुरणा भागातील घटना)

सुमन आणि सुरज यांनी कट रचुन अभिजीत पांडे नामक एका व्यक्तीला 15 हजार रुपयांची सुपारी दिली. अभिजीत पांडे हा सुरजचा मित्र आहे. या हत्येसाठी एक महिन्यापासून तयारी सुरु होती. त्यातूनच सुरजने एक दिवस रामेश्वर याला जेवण्याच्या निमित्ताने हॉटेलला नेले. हे हॉटेल शहराबाहेर एका ढाब्यासारखे होते. तेथे त्यांनी खूप मद्यप्राशन केले. मद्यप्राशन करुन परत येताना सुरज आणि अभिजीत यांनी रामेश्वर याला दुचाकीसह वर्धा नदीत फेकले.

दरम्यान, पोलिसांना दिलेल्या माहितीत सुरजने पोलिसांना सांगितले की, आम्ही दुचाकीवरुन परत येत होतो. या वेळी समोरुन एक वाहन आले. ज्यामुळे आमचे बाईकवरील नियंत्रण सुटले. या वेळी रामेश्वर नदीत कोसळला. आम्ही पुलावरच पडल्याने वाचलो. मात्र, संशय आल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यात रामेश्वरची हत्या झाल्याचे पुढे आले. सुरजने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.