'रोज म.रे. त्याला कोण रडे' अशी अवस्था झालेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पावसाळ्यात प्रवाशांची होणारे हाल कमी करण्यासाठी आणि त्यांना तात्काळ सुविधा उपलब्ध होण्यासाठी मध्य रेल्वेच्या 4 महत्त्वाच्या अशा वर्दळीच्या रेल्वे स्थानकांवर 'तात्काळ मदत पथक' (Quick Response Team)नेमण्याचा निर्णय घेतला आहे. ही चार महत्त्वाची स्टेशन्स आहेत ठाणे,कुर्ला, कल्याण आणि दादर.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी या संबंधी अधिक माहिती देताना सांगितले की, "रेल्वे प्रवाशांना पावसाळ्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना त्वरित हवी ती मदत करता यावी यासाठी मध्य रेल्वेने 4 तात्काळ मदत पथकाची तुकडी नेमणार आहे. हे एकूण 60 लोकांचे पथक असेल. हे पथक गर्दीला नियंत्रित करणे, बचाव कार्य आणि प्रथमोपचार यांसारख्या सुविधा त्वरित उपलब्ध करुन देण्यास कायम तत्पर असेल".
सप्टेंबर 2017 मध्ये एल्फिस्टन रेल्वे स्थानकात झालेल्या दुर्घटनेनंतर गर्दीचे नियोजन करण्यावर आमचा विशेष भर असेल, असेही ते म्हणाले. तसेच ह्या 4 रेल्वे स्थानकां व्यतिरिक्त इतर स्थानकांवर 252 महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी तैनात करण्याची त्यांची योजना आहे.
तसेच गर्दीला नियंत्रण मिळविण्यासाठी मॉक ड्रिल्स ची साखळी देखील सुरु केली गेली आहे असे ते म्हणाले.