Central Railway: मध्य रेल्वे प्रवाशांसाठी सुरु करणार नवी प्रणाली, लांब पल्ल्यासाठी होणार बायोमेट्रिक पडताळणी
Indian Railways (Photo Credits: PTI)

Mumbai: मध्य रेल्वेने (Central Railway) प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाश्यांना रेल्वेच्या प्रवासात एका नवा बदल लवकरच पाहायला मिळणार आहे. मध्य रेल्वे वरील मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) व लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) , कुर्ला (Kurla) येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी बायोमेट्रिक (Biometric)पद्धतीने तिकीट बुकिंग सुरु करण्याचा रेल्वेचा बेत आहे. या नुसार प्रवाश्यांच्या बोटांचे ठसे, डोळे अशा शारीरिक गुणधर्मच्या ओळखी नोंदवून घेतल्या जातील. रेल्वेतून अवैध प्रवास करण्याऱ्यांवर आळा बसेल तसेच अनआरक्षित डब्ब्यांमध्ये बैठक व्यवस्था सुकर होईल अश्या हेतूने ही प्रणाली तयार करण्यात येणार आहे याशिवाय या बदलामुळे प्रवासादरम्यान होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांवर देखील जरब बसेल असे मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी टाइम्सने मांडलेल्या वृत्तात सांगितले आहे.  मुंबईची शान CSMT परिसर होणार फेरीवाले, भिकारी आणि गर्दुलेमुक्त; 1 मे पासून नियम लागू

या प्रकल्पाच्या उभारणीसाठी CSMT आणि LTT या स्थानकांवर सुमारे साडे पाच लाख रुपयांच्या चार मशिन्स लावण्याचे रेल्वेने योजले आहे. यासाठी येत्या काहीच दिवसात वेगवेगळ्या कंपनींच्या निविदा (Tenders) मागवण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस.के.जैन यांनी दिली.

लांब पल्ल्याच्या प्रवाश्यांनी नवीन बायोमेट्रिक पद्धती अंतर्गत आवश्यक माहिती प्रवासाच्या एक दिवस आधी रेल्वेच्या कार्यलयात देऊन टोकन प्राप्त करायचे आहे.प्रवासाच्या दिवशी ट्रेन मध्ये चढतेवेळी हे टोकन तपासून मगच प्रवेश दिला जाईल. ही माहिती प्रवासानंतर दोन महिन्यांनी रेल्वेच्या प्रणालीतून काढून टाकण्यात येईल.

या प्रणालीमध्ये प्रवाश्याची वैयक्तिक माहिती जसे की नाव आणि संपर्क नोंदवला जाणार नाही ज्यामुळे सुरेक्षेला धोका पोहचणार आहे. याउलट शारीरिक गुणधर्मांमुळे कोणत्याही प्रवाशाला प्रवासा दरम्यान ट्रेस करणे शक्य होईल. मागील काही दिवसात नशेच्या अवस्थेत प्रवास केल्याच्या तसेच चोरी, छेडछाडी, दहशतवादी कृत्याच्या अशा घटना समोर आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जातेय. याशिवाय विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर देखील यामुळे बंधन येऊन रेल्वेचे नुकसान वाचू शकेल अशी आशा मध्य रेल्वेने वर्तवली आहे.