
कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) हादरून सोडले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सर्वसामान्य लोकांपासून अनेक राजकीय नेते आणि कलाकारांना देखील कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहे. यातच पुणे (Pune) जिल्ह्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांना करोनाची लागण झाली आहे. महेश लांडगे यांच्या प्रकृतीमध्ये बदल वाटल्याने रविवारी त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ज्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुण्यात आढळून आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. दरम्यान, महेश लांडगे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात भेट दिली होती. त्यावेळी शहरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देखील यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, महेश लांडगे यांना रविवारी अशक्तपणा जाणवत होता. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. आज पहाटे त्यांचा कोरोनाचा अहवाल आला होता. ज्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे देखील वाचा- Coronavirus रुग्णांना प्लाझ्मा थेरपी देण्यासाठी ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ ची सुरुवात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या उपक्रमाचे उद्घाटन
महेश लांडगे हे भोसरी मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. महेश लांडगे 2014 मध्ये अपक्ष म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व घेतले होते. पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लांडगे भाडपच्या चिन्हावर मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. आता त्यांची भाजपच्या शहराध्यशपदी निवड झाली आहे.