Covid-19 Vaccination in Mumbai: उद्यापासून मुंबई मधील bed-ridden नागरिकांच्या कोविड-19 लसीकरणाला सुरुवात
Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

अंथरुणाला खिळलेल्या (bed-ridden) नागरिकांचे कोविड-19 लसीकरण (Covid-19 Vaccination) मुंबई महानगरपालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) उद्यापासून प्रयोगिक तत्त्वावर सुरु केले जाणार आहे. शहरातील के वार्ड (K-Ward) मधील पूर्व भागापासून लसीकरणाला सुरुवात होणार असून यामध्ये अंधेरी पूर्व, मरोळ, चकाला सह इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे. बीएमसीने (BMC) गुरुवारी या संदर्भातील निवेदन जारी केले. या अंतर्गत विविध शारीरिक किंवा मानसिक कारणांमुळे अंथरुणाला खिळलेल्या शहरातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. शुक्रवार, 30 जुलै पासून याला सुरुवात होणार आहे. (मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे घरोघरी जावून लसीकरण करण्यासाठी ईमेल द्वारे असा करा संपर्क)

तज्ञ समितीच्या सल्ल्यानुसार या नागरिकांना कोव्हॅसिन लस देण्यात येणार असून लसीकरण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल. तसंच आवश्यक ती काळजी घेण्यात येणार असल्याचेही बीएमसीकडून सांगण्यात आले आहे.

विविध शारीरिक किंवा मानसिक कारणांमुळे लसीकरण केंद्रावर जावून लस घेऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी घरोघरी लसीकरणाची मागणी होत आहे, असे बीएमसीने सांगितले. या लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे. त्यात रुग्ण पुढील 6 महिने तरी अंथरुणावरुन उठू शकत नसल्याचे स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. ही लसीकरण मोहिम एनजीओ 'प्रोजेक्ट मुंबई' च्या साहाय्याने राबवण्यात येणार आहे. के-ईस्ट वार्ड मधील लसीकरण प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर पुढील लसीकरण टप्प्यात आवश्यक गोष्टींचा अंतर्भाव करण्यात येईल.

दरम्यान, अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांच्या लसीकरणासाठी covidvacc2bedridden@gmail.com हा ईमेल आयडी जारी करण्यात आला आहे. यावर आतापर्यंत 4,466 नागरिकांनी मेल केल्याचे बीएमसीने सांगितले.