मुंबईतील वृद्ध, अंध आणि दिव्यांग व्यक्तींना घरोघरी जावून लस देण्याचा बीएमसीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने नकार दिला आहे. डोअर टू डोअर जावून लस देण्यासंदर्भात केंद्र सरकारची कोणतीही योजना नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, घरोघरी जावून लस दिल्याने लसीकरणाचा वेग मंदावेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, तळागाळातील लोकांपर्यंत लस पोहचण्यासाठी विशेष मोहिम राबवली जाणार आहे. यात मोहिमेअंतर्गत लोकांना लस घेण्यासाठी दोन किमीपेक्षा अधिक प्रवास करावा लागणार नाही.
यावर मुंबई महापालिकेचे अतिरिक्त सचिव सुरेश काकाणी यांनी सांगितले की, "मुंबईत जवळपास दीड लाख लोक बेडरिटर्न किंवा अपंग आहेत. त्यामुळे केंद्रापर्यंत जावून लस घेणे त्यांना शक्य नाही. म्हणूनच घरोघरी जावून लस देण्याची परवानगी केंद्राकडे मागितली होती. मात्र अशा प्रकारची कोणतीही योजना नसल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. परंतु, सरकारकडून ही परवानगी मिळाली असती तर नक्कीच फायदा झाला असता." (Mumbai COVID-19 Vaccination: मुंबईतील खासगी केंद्रांवर 24x7 कोरोना लसीकरण होणार- BMC)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तळागाळातील लोकांपर्यंत लस पोहचवण्यासाठी सरकारने नवी योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत लोकांना लस घेण्यासाठी दोन किमी पेक्षा अधिक प्रवास करावा लागणार नाही. कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा हा सर्वोत्तम उपाय असून याद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत लस पोहचवता येईल. तसंच अनेक देशांनी अशा प्रकारची लसीकरण मोहिम राबवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दिवसाला 10 हजार रुग्ण आढळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तयार राहण्याच्या सूचना सुरेश काकाणी यांनी पालिकेचे सर्व डिन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.