Women Harassment( FIle photo)

महिलांवर होणा-या लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यातच माणुसकीला काळिमा फासणारी लज्जास्पद घटना वसईत (Vasai) घडली आहे. वसईतील एका नामांकित रुग्णालयात कोविडवर उपचार घेत असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नव्हे तर त्या महिलेच्या नग्न अवस्थेतील व्हिडिओ मोबाईलमध्ये काढून तिला पैशांची मागणी करत तिला ब्लॅकमेल (Blackmail) केल्याचा प्रकार देखील घडला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून माणिकपूर (Manikpur) पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार, वसईत राहणा-या 41 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला होता. उपचारासाठी ती वसईतील एका नामांकित रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी तिच्यावर उपचारादरम्यान ती बेशुद्धावस्थेत असताना रुग्णालयातील एका कर्मचा-याने त्या महिलेचे कपडे काढून तिचे नग्न अवस्थेतील फोटोज आणि व्हिडिओज काढून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.

हेदेखील वाचा- Shakti Act: महाराष्ट्रात आता बलात्कार, ॲसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा; नवीन कायद्यांना मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

या पीडितेचे नग्न अवस्थेतील फोटोज काढून त्या आरोपीने तिच्याकडून 10 लाखांची खंडणी मागितली. तसेच खंडणी न दिल्यास ही छायाचित्रे सोशल मिडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी महिलेने माणिकपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीवरून त्या आरोपीस अटक करण्यात आली.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्या आरोपीने याआधी असा प्रकार केला होता का याची देखील चौकशी केली जाणार आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. दरम्यान महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना (Shakti Act) विधिमंडळासमोर सादर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.