मुंबई: मुलुंड येथे कोरोना व्हायरस संक्रमीत एकही रुग्ण नाही, अफवांवर विश्वास ठेऊ नये: आमदार मिहिर कोटेचा
Fact check on Coronavirus rumours in Mulund. (Photo Credit:, Twitter)

मुंबईतील मुलुंड (Mulund) येथे कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमीत 5 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची सोशल मीडियावर पसरवण्यात आलेली महिती ही खोटी आहे. मुंलुंडमधील कोरोना व्हायरस ( COVID 19) बाधित रुग्णांची माहिती म्हणजे केवळ अफवा आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असा दिलासा देतानाच सरकारने अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करवी अशी मागणी मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांनी केली आहे. आमदार मिहिर कोटेचा यांनी विधिमंडळ सभागृहात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.

विधिमंडळ सभागृहासमोर वस्तुस्थिती मांडत असताना मिहिर कोटेचा म्हणाले की, सध्या सोशल मीडियावर एक अफवा पसरली आहे की, मुलुंडमधील 5 रुग्णांची सीओव्हीआयडी 19 (कोरोना व्हायरस) साठी तपासणी झाली आहे. या पाचही जणांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. परंतू, असे काहीही घडले नाही. मुंबईत Covid-19 चाचण्या फक्त कस्तुरबा हॉस्पिटलमध्येच घेतल्या जात आहेत. त्यामुळे इतर कोणत्याही रुग्णालयाचा संदर्भ आला तर, तो सत्य समजू नये. सरकारनेही अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करवी, अशी मागणीही आमदार मिहिर कोटेचा यांनी सभागृहात केली. (हेही वाचा, Coronavirus In India: भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 73; 56 भारतीय तर 17 परदेशी Covid-19 बाधित)

मिहिर कोटेचा ट्विट

पुढे बोलताना कोटेचा म्हणाले की, टीव्हीवरील वार्तांकनासाठी वापरतात तशा पद्धतीचे एक चित्र बनवून व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. ही इमेज आणि माहिती पाहून नागरिकांनी मला फोन कॉल केले. शाळेच्या प्राचार्यांचेही मला फोन आले. मी महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, असा कोणताही रुग्ण सापडला नाही तसेच, कोणाचीही चाचणी झाली नाही. त्यामुळे सरकारने सायबर सेल विभागाची मदत घेऊन, अशा अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, असेही कोटेचा म्हणाले.