एसटी (ST) कर्मचाऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोनाची लागण झालेल्या एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचाराचा खर्च मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना विविध आजारांच्या उपचारासाठी झालेला वैद्यकीय खर्च सरकारकडून देण्यात येतो. त्यात आता कोविड-19 (Covid-19) या आजाराचाही अंतर्भाव केला आहे. यामुळे आता एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांचे कुटुंबिय यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याचा वैद्यकीय खर्च महामंडळाकडून करण्यात येणार आहे. या संदर्भातील परिपत्रक कर्मचारी वर्गाचे महाव्यवस्थापक माधव काळेय यांनी जारी केलं आहे.
यापूर्वी सरकारी कर्मचारी आणि कुटुंबियांना कोरोनावरील खर्चाची परतफेड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाअंतर्गत शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांनी कोरोनावरील उपचार खाजगी रुग्णालयात केलेले असल्यास त्यांना खर्चाची रक्कम परत दिली जाणार आहे. (शासकीय कर्मचारी आणि कुटुंबियांना कोविड-19 वरील उपचाराचा खर्च परत मिळणार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय)
दरम्यान, सध्या राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 22,52,057 इतका झाला असून 52,610 मृतांची नोंद झाली आहे. एकूण 20,99,207 कोरोना संसर्गावर मात केली असून सध्या राज्यात 99,008 सक्रीय रुग्ण आहेत.
विशेष म्हणजे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दरदिवशी मोठी भर पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कडक निर्बंध लादले जात असून लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. तसंच कोरोना संबंधित नियम पाळण्याचे आवाहनही प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यातील काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.