COVID 19 Test | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव (Pune Divisional Commissioner Saurabh Rao) यांना 2 महिन्यांत दुसर्‍यांदा कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवार, 14मे दिवशीच त्यांनी कोविशिल्डचा दुसरा डोस घेतला आहे. त्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणं दिसली आणि  त्यानंतर सोमवारी त्यांचा कोविड 19 चा अहवाल पॉझिटीव्ह आला. इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना त्यांनी पुन्हा कोरोनाची लागण झालेल्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. '4 मे दिवशी केलेल्या चाचणीमध्ये अ‍ॅन्टीबॉडीज उत्तम संख्येत असल्याचे रिपोर्ट्स आहेत तरीही कोरोनाची लागण होणं हे माझ्यासाठी कोडं आहे. डॉक्टरांनी नमुने NIV कडे genomic sequencing साठी पाठवत त्याचा स्ट्रेन कोणता आहे हे तपासून घ्यावं' असे सांगितल्याचंही म्हटलं आहे.

दरम्यान सध्या सौरभ राव हे होम क्वारंटीन आहेत. सध्या पुण्याच्या कोविड19 परिस्थितीवर ते लक्ष ठेवून होते. अनेक ठिकाणी ते फ्रंटलाईन वरून काम करत होते. मार्च महिन्याच्या मध्यातही ते अशाच प्रकारे कोविड 19 च्या विळख्यात अडकले होते. त्यांचा कोविशिल्डचा दुसरा डोस 23 मार्चचा होता पण प्रोटोकॉलनुसार त्यांचं शेड्युल बदलण्यात आले आणि अखेरीस त्यांनी मागील शुक्रवारी डोस घेतला.

तज्ञांच्या माहितीनुसार, कोविड 19 लसीकरणानंतरही कोविडची लागण होऊ शकतो. सध्या एकापेक्षा अनेक व्हेरिएंट असल्याने हा आजार पुन्हा होऊ शकतो. असादेखील अंदाज लावला जात आहे की त्यांना लस घेण्याआधीच कोरोनाची लागण झालेली असू शकते.