महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक पाठोपाठ नागपूर मध्येही कोरोना रूग्णसंख्येमधील वाढ चिंतेची बाब आहे. सध्या अनेक ठिकाणी अजूनही ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड आणि औषधांचा तुटवडा असल्याने रूग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत आहे. स्ध्याची नागपूर मधील परिस्थिती पाहून देखील स्थानिक नगरसेवक बंटी शेळके यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना परत आणण्याची मागणी केली आहे. हा गोंधळ स्थानिक नेते आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोरच झाला आहे.
दरम्यान तुकाराम मुंढे यांच्यासारखे खमके अधिकारी असल्याशिवाय सरकारी अधिकारी सुधारणार नाहीत असे म्हणत त्यांनी पालिकेच्या कामकाजावर बोट ठेवलं आहे. सध्या अनेक ठिकाणी कोरोना परिस्थिती बिघडत असल्याने आता नागरिकांसोबतच लोकप्रतिनिधींचाही संयम सुटत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बंटी शेळके यांनी नागपूर प्रमाणेच नाशिकच्या परिस्थितीवरही आपला संताप व्यक्त केला आहे.
तुकाराम मुंढे हे एक वक्तशीर आणि कड शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये तुकाराम मुंढे नागपूरच्या पालिका आयुक्त पदी होते. तेथे त्यांनी फिल्डवर उभं राहून जातीने कोवीड 19 नियमावलीचं पालन करण्याचं काम केले होते. मात्र कोरोना उपाययोजनांच्या अंमलबजावणीवरुन आयुक्त तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये अनेकदा वाद झाले. लोकप्रतिनिधी विरूद्ध प्रशासन हा वाद टोकाला गेला. भर सभेतून उठून जाण्याचा प्रकार देखील झाला होता. यावेळी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला पण भाजपच्या नगरसेवकांनी मुंढे यांच्यावर टीकस्त्र डागलं. नंतर मुंढे यांची मुंबई मध्ये बदली झाली आहे.