Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

जगभरात जाळे पसवरलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) भारतासह महाराष्ट्रात सुद्धा शिरकाव केला आहे. तर दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा आता वाढत चालला असून ही एक चिंतेची बाब आहे. तरीही सरकारकडून कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. त्याचसोबत येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करुन गावाला जायची वाट पकडू नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून  करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे नवे 8 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून कोरोनाबाधितांची आकडेवारी वारंवार जाहीर करण्यात येते. तर ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे नवे 8 रुग्ण आढळून आले आहेत. या 8 पैकी 7 जण हे मुंबईतील असून 1 जण हा नागपूर येथील असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 167 वर पोहचला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची एकण आकडेवारी पाहता यापूर्वी पुण्यात सर्वाधित रुग्ण असल्याचे दिसून आले होते. पण आता मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे.(Quarantine चा शिक्का असतानाही घराबाहेर फिरणा-यांना पोलिसांच्या ताब्यात द्या- जयंत पाटील)

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर देशातील डॉक्टर्स रात्रंदिवस काम करत आहेत. तसेच पोलिस ही रस्त्यांवर गस्त घालून नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन करत आहेत. सध्या महाराष्ट्रात राज्य सरकारकडे कोरोनाचा सामना करण्याची उत्तम सोय आहे. मात्र त्यात जर त्यांना अधिक मदत हवी असेल तर नौदल सज्ज असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.