COVID-19: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 1 लाख 10 हजार एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार
ST Bus (Image used for representational purpose only) (Photo credits: PTI)

कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून विधिमंडळाचे सर्व सदस्य, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या तसेच शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या माहे मार्च महिन्याच्या वेतनात ठराविक कपात करून वेतन देण्यात येणार असल्याबद्दल निर्णय झाला होता. त्यानुसार एसटीच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी यांच्या इमेल आदेशानुसार एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत अदा न करण्याबाबतचे आदेश राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत. या आदेशामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या निर्णयाच्या धर्तीवर राज्य परिवहन कर्मचारी व अधिकाऱ्यांचे दिनांक 1 एप्रिल 2020 चे अनुसूचित वेतन मध्यवर्ती कार्यालयाकडून पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत अदा करण्यात येऊ नये, असे या आदेश या सूचनेत नमूद करण्यात आले आहेत

कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याला अर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी 31 मार्च रोजी सरकार कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यावर स्षटीकरण देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करणार नसल्याचे सांगितले. परंतु, सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार टप्प्याने होणार असल्याची महिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. सरकारने कोणत्याही कर्मचाऱ्याची वेतन कपात केली नाही. कोरोना व्हायरस हे अचानक उद्भवलेले मोठे संकट आहे. कोरोना संकट दूर केल्यावर येणारे दुसरे एक संकट येणार आहे. ते म्हणजे आर्थिक संकट. आर्थिक घडी कोणी विस्कटवली तरी, ती मोडू नये यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे. म्हणूनच राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे फक्त टप्पे केले आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करुन घेऊ नये. कृपा करुन समजून घ्या. सहकार्य करा. जसजसे दिवस पुढे जात आहेत तसतसे या लढाईतील निर्णायक टप्पा पुढे येत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद; गेल्या 3 दिवसांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 93 कोटी जमा

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 8 लाख 57 हजार वर पोहचली आहे. यांपैकी 42 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 78 हजार रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 251 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 101 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 321 वर पोहचली आहे. यात 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.