मनसे नेते आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांचा अॅट्रॉसिटी प्रकरणात (Atrocity Case) औरंगाबादच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे हर्षवर्धन जाधव यांना मोठा धक्का बसला आहे.
जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी हर्षवर्धन त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी गुन्हा झाला होता. अटक टाळण्यासाठी जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आज या प्रकरणी औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्वी जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे जाधव यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - मनसेचे शॅडो कॅबिनेट जाहीर: जाणून घ्या अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमेय खोपकर, शालिनी ठाकरे, अनिल शिदोरे आदी नेत्यांकडे कोणती जबाबदारी)
हर्षवर्धन जाधव यांच्या जमिनीच्या प्लॉट शेजारी एक टपरी होती. ही टपरी काढण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी टपरी मालकाला जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिली होती. त्यामुळे पीडित व्यक्तीने त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. हे माझ्याविरोधातील राजकीय षडयंत्र आहे. मी शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे मला अडकवण्याचा प्रयत्न आहे, असंही जाधव यांनी म्हटलं आहे.
मागील महिन्यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महाअधिवेशन मुंबईत पार पडलं. या अधिवेशनाअगोदर हर्षवर्धन जाधव यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील सतत वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्त्व आहे. हर्षवर्धन जाधव यांना लोकसभेनंतर विधानसभेतदेखील पराभवाचा सामना करावा लागला होता.