देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाने आता चांगलाच जोर धरला आहे. त्यात महाराष्ट्राची स्थिती सध्या चिंताजनक आहे. महाराष्ट्रात आज कोरोनाच्या 31,855 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण संक्रमणाची संख्या 25,64,881 वर पोहोचली आहे. आज राज्यात 15098 लोक बरे झाले असून आतापर्यंत 22,62,593 लोक या आजारामधून बरे झाले आहेत. महाराष्ट्र आज 95 कोरोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृत्यूंची संख्या 53,684 वर पोहोचली आहे. सध्या तब्बल 2,47,299 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
बुधवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूची सक्रिय प्रकरणे 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त आहेत. हे जिल्हे- पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, बेंगळुरू अर्बन, नांदेड, जळगाव, अकोला असे आहेत. या 10 जिल्ह्यांपैकी 9 जिल्हे महाराष्ट्रातील आणि एक जिल्हा कर्नाटकचा आहे. केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाले की, महाराष्ट्र आणि पंजाब ही दोन राज्ये आमच्यासाठी गंभीर चिंतेची बाब आहे. (हेही वाचा: Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आढळला कोरोना विषाणूचा E484Q आणि L452R वेरिएन्ट)
कोरोना विषाणूचे नवे म्यूटेशन सुमारे 15 ते 20 टक्के नमुन्यांमध्ये आढळून आले आहे आणि तो याआधी आढळलेल्या कोरोनाच्या रूपांशी जुळणारा नाही. महाराष्ट्रातील नमुन्यांच्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की, डिसेंबर 2020 च्या तुलनेत कोरोना नमुन्यांमध्ये E484Q आणि L452R म्यूटेशनचा अंश वाढला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचीराजधानी मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 5185 रुग्णांची व 6 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह एकूण रुग्णसंख्या 3,74,611 वर पोहोचली आहे. आज शहरात 2088 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 3,31,322 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरात 30,760 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत आतापर्यंत 11606 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.