Coronavirus: गरज भासल्यास सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांवर अन्नधान्य वितरीत करु - छगन भुजबळ
Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal | Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांमुळे नागरिकांनी गोंधळून जाऊ नये. तसेच, अन्नधान्याचा साठा करण्यासाठी दुकानांवर गर्दी करु नये. सरकारकडे आवश्यक इतका अन्नधान्य साठा आहे. आवश्यकता भासल्यास सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांवर (Ration Shop) दोन महिने पुरेल इतके अन्नधान्य वितरीत केले जाईल, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.

कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने काही शहरांमध्ये जमावबंदी आदेश लागू केला आहे. राज्यातील चित्रपटगृहं, मॉल्स, तरणतलाव, व्यायामशाळा, शाळा, अंगणवाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काही खासगी व्यावसायिकांनी स्वत:हून आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांनीक शहर बंद केले जाते की काय असे वाटल्याने अन्नधान्य साठा करण्यासाठी दुकानांवर गर्दी केली आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रीत करण्याच्या राज्य सरकारच्या सूचनेला कुठेतरी बाधा पोहोचत आहे. त्यामुळेच राज्याच्या अन्न व नागरि पुरवठा मंत्रालयाने सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांवर दोन महिने पुरेल इतके अन्नधान्य वितरीत केले जाईल, अशी माहिती दिली आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याल उद्देशून आज सकाळी संबोधित केले. या वेळी केलेल्या भाषणात राज्यातील जनतेने सहकार्य करावे. स्वत:हून गर्दी नियंत्रीत करावी. कोणताही निर्णय घेण्यास सरकार सक्षम आहे. पण, जनतेने सहकार्य केल्यास सरकार कठोर निर्णय घेणार नाही. पण, नागरिकांनी सहकार्य केले नाही तर, मात्र सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील. (हेही वाचा, Coronavirus: खबरदार! पळून जाल तर, क्वारंटाईन विभागातून पळणाऱ्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा)

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही जनतेने स्वत:हून सहकार्य करावे. गर्दी करु नये. काळजी घ्यावी. अन्यथा शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारला घ्यावाच लागेल, असा इशारा दिला आहे. पण, जनतेने सहकार्य केले तर हा कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता भासणार नाही.