Coronavirus: खबरदार! पळून जाल तर, क्वारंटाईन विभागातून पळणाऱ्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा
Home Minister Anil Deshmukh | Photo Credits: Facebook)

Coronavirus: गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी विलगिकरण (Quarantine) कक्षातून पळून जाणाऱ्या COVID-19 संशयित रुग्णांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. क्वारंटाईन म्हणजेच विलगिकरण कक्षातून काही रुग्ण पळाल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, असे जर अचानक कोणी निघून गेले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. सीओव्हीआयडी-19 (COVID-19 संसर्ग टाळण्यासाठी कारणाशिवाय घराबाहेर पडणे टाळा. हात स्वच्छ धूत राहा. अस्वच्छ हातांनी नाक, कान, डोळ्यांना स्पर्ष करु नका, असे अवाहनही गृहमंत्र्यांनी केले.

सरकारने कोरोना व्हायरस नियंत्रणाबाबत दिलेल्या सूचना आणि त्यांची अंमलबजावणी याची माहिती देण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक पत्रकार परिषद आज घेतली. या वेळी ते बोलत होते. या वेळी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर विभाग बारीक लक्ष ठेऊन आहे. काही लोकांवर कारवाईही करण्यात आली आहे. आयसोलेशनमध्ये ठेवलेल्या नागरिकांनी तिथेच थांबणे आवश्यक आहे. जर कोणी आयसोलेशनमधून पळून जाण्याचा विचार केला तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.

नागरिकांनी जर स्वत:हून सहकार्य केले तर 'लॉकडाऊन' करण्याची गरज नाही. पण, जर लोकांनी गर्दी नियंत्रणात न आणता सहकार्य केले नाही तर मग तो निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा तशी कारवाई करण्याची गरज नाही. राज्यातील दारुची दुकानं, बार, हॉटेल, पब्ज, व्यायामशाळा आदी बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे देशमुख यांनी सांगितले. (हेही वाचा, Home Quarantine चा सल्ला दिलेले कोरोना संशयित रूग्ण समजात फिरताना दिल्यास गुन्हा दाखल करा; गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायजर आदिंची साठेबाजी केल्याच्या तक्रारी येत आहेत. काही ठिकाणी सॅनिटायजर भेसळ करण्याच्यही घटना घडल्या आहेत, याबाबत विचारले असता सर्व गोष्टींवर पोलिसांची बारीक नजर आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे अनिल देशमुख यांनी सांगितले. तसेच, महाराष्ट्रातील कारागृहातील कैद्यांचीही तपासणी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे देशमुख यांनी या वेळी सांगितले.