राज्यातील वाढती कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लागणार का? हा प्रश्न महाराष्ट्रातील असंख्य नागरिकांना पडला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना जेव्हा प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा उल्लेख करत स्पष्ट संकेत दिले. अजित पवार म्हणाले, 'राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे. राज्यात जर 700 मेट्रीक टन पेक्षाही अधिक प्रमाणावर ऑक्सिजनची मागणी होऊ लागली तर मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही'.
कोरोना व्हायरस संदर्भात राज्य स्तरावर जे काही निर्णय घेतले जातात ते राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्रीच घेत असतात. त्यामुळे त्याबबत घेतलेल्या निर्णयांची नियमावली मंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे. नियमावली जाहीर करुनही अनेक लोक गंभीर नाहीत. राज्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. अनेक लोक घरीच थांबून उपचार घेत आहेत. राज्याचा आरोग्य विभाग त्याबाबत माहिती गोळा करत आहे. मात्र, हे सर्व ठिक आहे तोपर्यंत ठिक आहे. उद्या जर राज्यात 700 मेट्रीक टनपेक्षा अधिक क्षमतेने ऑक्सिजनची मागणी होऊ लागली तर मात्र, मुख्यमंत्री एखादा कठोर निर्णय घेऊ शकतात असे अजित पवार म्हणाले. (हेही वाचा, पुण्यात आतापर्यंत 1000 हून अधिक पोलिसांना कोरोना लसीचा बूस्टर डोस, संसर्गाविरूद्ध लसीकरणाची मोहीम सुरूच)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थितीत होते. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, बैठक घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला उपस्थित राहिलेच पाहिजे असे नाही. सद्या कोरोनाचा काळ आहे. एखाद्याला अडचण असते, कोणी विलगिकरणात असतो इतरही काही कारण असू शकते. त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण किंवा टीका-टिप्पणी करण्याची गरज नाही. राज्याची कोरोना संकटाची हाताळणी चांगल्या पद्धतीने सुरु असल्याचेही अजित पवार म्हणाले.