कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर आमची बारीक नजर आहे. जी रुग्णालयं अवाजवी बिल आकारतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच, यापुढे कोरना व्हायरस रुग्णांवरील उपचारांचे बिले हे सरकारी ऑडीट केल्यानंतरच दिले जाईल, अशी माहिती राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. राजेश टोपे हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. टोपे यांनी दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थिती होते.
राजेश टोपे यांनी सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णांच्या दुप्पटीचा वेग (डबलींग रेट) मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. औरंगाबादमधला डबलींग रेट 14 वरुन 26 दिवस इतका खाली आला आहे. घाटी रुग्णालयासंदर्भात त्यांनी सांगितले की, घाटी रुग्णालयातील रिक्त पदं लवकरच भरली जातील. (हेही वाचा, Coronavirus Update: महाराष्ट्रात 'या' वयोगटात सर्वाधिक कोरोना रुग्ण; महिलांपेक्षा पुरुष कोरोनाबाधितांची संख्या अधिक)
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना व्हायरस स्थितीचा आढावा घेण्यासाठी राजेश टोपे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यानी घाटी रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसारमाध्यमांच्या विविध प्रश्नांना माहिती दिली.