Coronavirus: कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य सरकारने केलेली सूचना राज्य निवडणूक आयोगाने स्वीकारली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व महापालिका राज्यातील महापालिका निवडणूक, जिल्हा परिषद, नगरपालिका पोटनिवडणूक, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका रद्द करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोग द्वारा देण्यात आलेले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान (State Election Commissioner U.P.S. Madan) यांनी आज (17 मार्च 2020) ही माहिती दिली.
राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी माहिती देताना सांगितले की, कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पुढील सूचना येईपर्यंत राज्यातील सर्व निवडणूक कार्यक्रम स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल आहे. या प्रयत्नाचा भाग म्हणून राज्यीतल निवडणूक स्थगित ठेवण्याची विनंती राज्य सरकारने केली होती. त्यावर विचार करत तसेच मुंबई उच्च न्यायालयाने 10 ऑगस्ट 2005 रोजी एका निर्णयाद्वारे दिलेल्या अधिकाराचा वापर करत निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. 10 ऑगस्ट 2005 मध्ये न्यायालयाने निर्णय देत 'नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अथवा स्थगित करण्याचा अधिकार दिला आहे, असेही मदान या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Coronavirus च्या धोक्यामुळे महापालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका 3 महिन्यांसाठी पुढे ढकलल्या- राजेश टोपे)
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या अधिकारानुसारच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व निवडणूक कार्यक्रमांना स्थगिती दिल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी म्हटले आहे. राज्यात विविध जिल्हा परिषद, महापालिका, महानगर परिषदा, ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार प्रभाग रचना, मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणूक इत्यादी स्वरुपाचे सर्व कार्यक्रम नियोजित करण्यात आले होते. मात्र, नव्या आदेशानुसार हा सर्व कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे.