पुणे (Pune) येथील कोरोना व्हायरस(Coronavirus) लक्षणे आढळलेल्या 16 रुग्णांना उपचारानंतर प्रकृती बरी झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकर आणि आरोग्य प्रशासन काहीसे आनंदीत झाले होते. मात्र, एका बाजूला ही आनंदवार्ता असतानाच कोरोना बाधीत 5 नव्या रुग्णांची चाचणी काल पॉझिटिव्ह आढळली. यात धक्कादायक असे की, या पाचातील एक जण हा 93 जणांच्या ग्रुपसोबत थायलंड येथे फिरायला गेला होता. त्यामुळे या ग्रुपमधील बाकी मंडळींचा शोध घेणे सुरु आहे. या नव्या रुग्णामुळे प्रशासनासमोर पुन्हा एकदा नव्याने आव्हान निर्माण झाले आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (Divisional Commissioner Deepak Mhaisekar) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यात सध्या कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची एकूण संख्या 15 इतकी आहे. या सर्व रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. कोरोनाची लक्षण आढललेले जे काही रुग्ण आहेत. त्यापैकी 16 जणांना उपचारानंतर बरे वाटू लागल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे, असेही म्हैसेकर यांनी सांगितले.
पुण्यातील अंगणवाड्या आणि मॉलही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील सर्व मॉल बंद राहणार आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा देणारी दुकानेच सुरु ठेवण्यात येणार आहेत. यात किराना माल दुकाने, फळ आणि भाजीपाला, दूध विक्री करणारी दुकाने सुरु ठेवण्यात येणार आहेत, असेही म्हैसेकर म्हणाले. (हेही वाचा, Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला फोन)
दरम्यान, वसितीगृह खाली करण्याबाबत कोणत्याही विद्यापीठांना आदेश देण्यात आले नाहीत. वसतीगृहं खाली करण्याबाबतचा सर्वस्वी निर्णय हा त्या त्या विद्यापीठांचा राहील. मात्र, नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये. तसेच परस्परांमध्ये योग्य अंतर बाळगणे आवश्यक असल्याचेही दीपक म्हैसेकर यांनी या वेळी सांगितले.